मुंबई - बालरंगभूमी परिषद, बृहन्मुंबई शाखेतर्फे दि. २५ ऑगस्ट रोजी ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाअंतर्गत लोककला प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. विक्रोळी येथील संदेश विद्यालयात हे शिबिर झाले. या शिबिरात बृहन्मुंबईतील १४ शाळेतील १२२ विद्यार्थी सहभागी झाले. या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री तथा बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनील सागवेकर, प्रमुख कार्यवाह आसेफ अन्सारी, सह कार्यवाह हनुमान पाडमुख, ज्ये ष्ठ नाट्यकलावंत पेंडणेकर, ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था विक्रोळी विश्वस्त मेघा राजेंद्र म्हात्रे , गायक आणि संगीतकार मनोहर म्हात्रे हे उपस्थित होते. या शिबिरात मुंबई विद्यापीठ लोककला विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना लोकगीत, भारुड, पोवाडा, गोंधळ, जागरण यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेतले, प्रशिक्षक पवित्र सावंत यांनी ढोलकी व इतर वाद्यांचे प्रशिक्षण दिले, प्रशिक्षक मनोहर म्हात्रे यांनी वारली गीतांचे तसेच आगरी धवला गीत व फेरगीतांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेतले. प्रशिक्षक उलका दळवी यांनी लावणी गायन, लावणी नृत्य आणि शेतकरी नृत्य यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन करून झाले त्यावेळी संदेश विद्यालयाने गण सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसेफ शेख यांनी केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू देसाई व सुनील सागवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हनुमान पादमुख यांनी केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.