बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे नेक रहेंगे’

एकता टिकवून ठेवण्याचा योगी आदित्यनाथ यांचा हिंदूंना संदेश

    26-Aug-2024
Total Views |

Yogi Adityanath
 
नवी दिल्ली : बांगलादेशातील स्थिती पाहता “बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे” हे धोरण अत्यावश्यक आहे, असा संदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभरातील हिंदू समुदायास दिला आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील आगरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दुर्गादास राठोड यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, आपल्या सर्वांसाठी राष्ट्र सर्वोपरी आहे. राष्ट्राच्या मजबुतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्र तेव्हाच मजबूत होईल जेव्हा आपण एकत्र राहू. समाज, जात आणि भाषेच्या नावावर फूट पाडणाऱ्या शक्तींपासून सावध राहायला हवे. सध्या बांगलादेशात काय सुरू आहे, हे आपण बघतच आहोत. त्यामुळे “बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे” हे कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे, असा संदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू समाजाला दिला आहे.
 
सनातन धर्म आणि भारतापुढील आव्हाने एकाच प्रकारची असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संतांनी आपल्या समाजास एकत्र करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. आपल्याकडूनच चूक झाली आणि समाजात पुन्हा फूट पडली, तर त्यामुळे सुरू असलेली कटकारस्थाने यशस्वी होऊन परिस्थिती आणखी बिकट होईल. जेव्हा सनातन धर्म, देश आणि हिंदू समाज सुरक्षित असेल तेव्हाच धर्मग्रंथ, तत्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र सुरक्षित राहील. आपण प्रत्येकाला एकत्र करून त्या फुटीर शक्तींचा बुरखा फाडला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.