संजय राऊतांची उबाठांकडे तक्रार! महिलेचं पत्र व्हायरल

    26-Aug-2024
Total Views |
 
Raut & Thackeray
 
मुंबई : शनिवारी उद्धव ठाकरेंनी महिला सुरक्षेबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यानंतर डॉ. स्वप्ना पाटकर यांनी त्यांना एक पत्र लिहित थेट संजय राऊतांची तक्रार केली आहे. यात त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले असून हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
 
 
स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे :
 
“नमस्कार उद्धव दादा, महिला सुरक्षिततेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. ‘नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीससुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत,’ असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले."
 
“मी २०१६ ते २०२१ पर्यंत तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही, असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले. मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे. माझे काम बंद करण्यात आले. घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.”
 
हे वाचलंत का? -  "जाऊ दे मरु दे त्या मुलीला..."; जितेंद्र आव्हाडांची ऑडिओ क्लिप व्हायरल
 
“माझा एक चित्रपट ‘डॉक्टर रखमाबाई’ रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकड़ून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोनवर शिवीगाळ केली, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असूनदेखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणीसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते, या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे,” असे स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात लिहिले आहे. या पत्राने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.