मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramgiri Maharaj Pune News) सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ३०० हून अधिक इस्लामिक कट्टरपंथींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीरपणे एकत्र जमल्याप्रकरणी आणि परवानगीशिवाय निषेध मोर्चा काढल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरतावाद्यांनी शुक्रवारी प्रशासनाची आवश्यक परवानगी न घेता निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने कट्टपंथी मोर्चाला उपस्थित होते. महंत रामगिरी महाराज यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या धर्मगुरूंविरूध्द केलेल्या वक्तव्यामुळे सदर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु यावेळी ‘सर तन से जुदा’च्या आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १९०, १९६, आणि २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ आणि ३७ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहदरम्यान एका प्रवचनादरम्यान, महंत रामगिरी महाराज यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या धर्मगुरूंविरूध्द वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी गैरहिंदूंनी निषेध रॅली काढली. या प्रकरणी रामगिरी महाराजांच्या विरोधात निरनिराळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला.