‘विज्ञानसागराची’ खोली समजून घेताना...

    24-Aug-2024
Total Views |
vidnyansagar book review


 वैज्ञानिक क्षेत्रात लागणारे नवनवे शोध मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करत असतात. हे शोध वर्षानुवर्षे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहतात. पण, शोध लावणारे शास्त्रज्ञ मात्र विज्ञानाच्या पुस्तकापुरतेच मर्यादित राहतात. कुठलाही शोध लागण्यापूर्वी, तो जगासमोर येण्यापूर्वी त्या संशोधनात शास्त्रज्ञाने त्याचे आयुष्य खर्ची घातलेले असते. अशाच काही शोधांची आणि शास्त्रज्ञांची कहाणी लेखक राहूल गोखले यांनी त्यांच्या ‘विज्ञानसागर’ या पुस्तकात मांडली आहे. ‘रावा प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात जगभरातील शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, त्या शोधामागची रंजक कहाणी आणि तो शोध लावणार्‍या शास्त्रज्ञाचे माहात्म्य मांडलेले आहे.

विज्ञान हे एखाद्या सागरासारखे सतत प्रवाही आणि अथांग असते. त्यामुळे या पुस्तकाला दिलेले नाव ‘विज्ञानसागर’ हे सूचक आणि अत्यंत समर्पक. पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तकात वापरलेल्या भाषेप्रमाणेच साधे पण अत्यंत प्रभावी आहे. अगदी शालेय वयातील मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुठल्याही वयातील आणि वैज्ञानिक क्षेत्राशी संबंध असणार्‍या आणि नसणार्‍या अशा सर्वच वाचकांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.

या पुस्तकात एकूण 23 प्रकरणे आहेत. जीवनसत्त्वे, मधुरके, कृत्रिम युरिया, मायक्रोव्हेव, प्लास्टिक, अ‍ॅस्पिरिन, विद्युत दिवा यांसारख्या गोष्टींच्या शोधामागची कहाणी या प्रकरणांमध्ये सांगितलेली आहे. इतर विज्ञान विषयाला वाहिलेल्या पुस्तकांप्रमाणे या पुस्तकात केवळ शोधाविषयी सांगून लेखक थांबलेले नाहीत, तर तो शोध लावण्याच्या ध्येयाने शास्त्रज्ञ कसे झपाटलेले होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्या शोधावर कसा प्रभाव पडला आणि तो शोध लावल्यानंतरसुद्धा त्याचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला, अशा सर्व बाजू लेखकाने या प्रकरणांमध्ये मांडलेल्या आहेत. काही अपघाताने लागलेल्या शोधांची रंजक गोष्टही या पुस्तकात सांगितलेली आहे, पण त्याचसोबतच या पुस्तकातील शोध अपघाताने लागला असे म्हटले तरी ते शास्त्रज्ञांनाच लागतात. कारण, ते सतत सजग असतात हे वाक्य कुठल्याही शोधामागे शास्त्रज्ञाची भूमिका किती महत्त्वाची असते हे सिद्ध करते.

हे पुस्तक जरी विज्ञान विषयाला वाहिलेले असले तरी अगदी सर्वसामान्यांना कळेल आणि रंजक वाटेल अशा भाषेत ते लिहिलेले असणे हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. साध्या सोप्या आणि प्रभावी भाषेचा वापर या पुस्तकात केलेला आहे. विज्ञान म्हटले की डोळ्यांसमोर येणार्‍या किचकट, कठीण संज्ञा या पुस्तकात फारशा नाहीत. वैज्ञानिक पुस्तकांमध्ये लालित्याचा अंतर्भाव फार कमी वेळा पाहायला मिळतो, पण या पुस्तकात विज्ञान आणि लालित्य यांचा मेळ लेखकाने उत्तम मेळ साधला आहे.

‘उष्माकांविना साखरेची गोडी’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘रामेश्वराऐवजी सोमेश्वर : अपघाती शोध’ यांसारख्या मथळ्यांवरुन ते लक्षातही येते. या पुस्तकात जरी वैज्ञानिक शोधांची आणि संशोधकांची माहिती सांगितलेली असली तरी त्या माहितीला कथात्मकता प्राप्त झालेली आणि ती कथात्मकता वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या अनेक गोष्टींमागचा इतिहास काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि त्या गोष्टींचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
पुस्तकाचे नाव : विज्ञानसागर
लेखकाचे नाव : राहूल गोखले
प्रकाशक : रावा प्रकाशन
पृष्ठसंख्या : 103
मूल्य : 240

दिपाली कानसे