समर्थांचे साहित्य म्हणजे भव्य आणि उत्कट विचारसौंदर्याचा आविष्कार. रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड नेण्याच्या मुख्य उद्देशाने समर्थ साहित्याची निर्मिती झालेली आहे. अनेक प्रकारे रामकथा लिहूनसुद्धा पुन्हा त्यांनी आत्माराम व मनाच्या श्लोकांमध्येही ते रामकथा सांगतात. ‘राम राम’ सर्व म्हणतात, पण ‘आत्माराम’ कोणी जाणत नाहीत, अशी खंत व्यक्त करतात. समर्थकृत ‘हरे राम’ मंत्राद्वारे आपण ‘आत्माराम’ जाणून मनुष्य जीवन धन्य करू शकतो. हीच या लेखांची अपेक्षा आहे.
‘आत्माराम’मधील निर्गुण राम
‘दासबोध‘ आणि ‘आत्माराम‘ हे ग्रंथ समर्थांचे वाङ्मयरूप आहे. ‘आत्माराम’ ही केवळ पाच समासांची छोटेखानी रचना आहे. ‘दासबोधा‘तील राम हा सगुण आहे, तर ‘आत्माराम‘मधील श्रीराम निर्गुण आहे. भारतामध्ये जे अनेक भक्तिसंप्रदाय आहेत, त्यात ‘सगुणभक्ती पंथ’ आणि ‘निर्गुणभक्ती पंथ’ असे दोन स्वतंत्र पंथ आहेत. परंतु, महाराष्ट्रातील वारकरी, समर्थ संप्रदाय हे सगुण-निर्गुण समन्वयवादी, ऐक्यवादी आहेत. ‘दासबोधा‘मधील सगुण रामाचे दर्शनानंतर साधकाची चित्तवृत्ती शांत व स्थिर होते आणि त्यांचा रामाच्या सगुण रूपाकडून, भक्तीकडून निर्गुणाकडे वाटचाल सुरू होते. साधक-उपासक ‘दासबोधाकडून‘ ‘आत्मारामा’कडे वळतो. समर्थ म्हणतात -
सगुण उछेदावे। आणि निर्गुण प्रतिपादावे।
परी ते निर्गुण चि स्वभावे सगुण होते॥
भक्तांसाठी निर्गुण ब्रह्म सगुणात प्रकट होते हे खरे असले तरी परमात्म्याचे, ब्रह्माचे, श्रीरामाचे मूळ निर्गुणच आहे. ब्रह्म रूप होऊन ब्रह्म अनुभवावे तसेच राम होऊन आत्मारामाची प्रचीती, प्रत्यय अनुभवावा. मीपणा जाऊन रामरूप होणे म्हणजेच अभेदभक्ती, सायुज्य मुक्ती होय.
समर्थांचा ‘आत्माराम’ म्हणजे संत ज्ञानदेवांच्या ‘अमृतानुभवा’सारखा प्रचीतीचा ग्रंथ आहे. यात समर्थांची ‘विश्वंभर झालो’, ‘सकळ देही विस्तारलो’ हे जे बोल आहेत ते तुकोबांच्या ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा’ या प्रचीतीसदृश आहेत. अंतरंगाने सर्व संत एकरूप असतात हेच यावरून सिद्ध होते. आत्माराम ग्रंथाचा प्रारंभ समर्थ रामाचे ध्यान, रामाला नमस्कार करूनच करतात.
आता नमस्कारीन रामा। जो योग्याचे निजधाम।
विश्रांतीचा निजविश्राम। जये ठायी॥1॥
ऐसा सर्वात्मा श्रीराम। सगुण निर्गुण पूर्णकाम।
उपमाचि नाही निरूपम। रूप जयाचे॥15॥
समर्थांच्या ‘आत्माराम’ ग्रंथाची नामयोगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनीही स्तुती केलेली आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात - ‘केवळ बद्धांनीच नव्हे, तर सिद्धांनीसुद्धा समर्थांच्या आत्मारामातील परमार्थ शिकायला हवा.’
मनोबोधातील रामदर्शन
‘प्रभाते मनी राम चिंतित जावा।’ राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रबोधक-प्रासादिक वाङ्मयातील ‘मनाचे श्लोक’, समस्त मराठी माणसांना परिचित आहेत. ‘मनाचे श्लोक’ म्हणत अवघ्या मराठी माणसांच्या काही पिढ्या संस्कारित झालेल्या आहेत. सहज, सरळ, सोप्या पण रोखठोक शब्दांत उपदेश करणारे हे ‘मनाचे श्लोक’ म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयाचे नवनीत आहे. मनाचे श्लोक हा समर्थ रामदासांचा समाजसंवाद, लोकसंवाद आहे; एवढेच नव्हे तर हे श्लोक नीतिशास्त्राची मूळाक्षरे आहेत, असे स्वामी वरदानंदभारती म्हणतात.
मनाच्या श्लोकामध्ये श्रीरामाचा उल्लेख वारंवार येतो. ‘सदा सर्वदा प्रिती रामी धरावी।’, ‘मना राघवाविण आशा नको रे’, ‘करी रे मना भक्ती या राघवाची‘, ‘दीनानाथ हा राम कोदंडधारी।’ अशा वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या पद्धतीने मनाच्या श्लोकांमध्ये रामदर्शन घडते. एवढेच नव्हे तर ‘अनुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ असा (28 ते 37) या 10 श्लोकात येतो, तसेच ‘मना सज्जना राघवी वस्ती कीजे।’ असा चरण (38 ते 47) पाच वेळा आढळतो. ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा।’ हा चरण (67 ते 76) दहा वेळा समर्थ वापरतात. याशिवायही काही चरणांमध्ये राघवाचा उल्लेख आहे. यावरून समर्थांचे जीवन, दृष्टी आणि उपदेश कसा राममय झालेला होता हेच दिसून येते.
समर्थांच्या अभंगगाथेतील राम तोचि विठ्ठल
समर्थांची दृष्टी सांप्रदायिक संकुचितपणाची नव्हती. विविध देवतांच्या नाम व रूपामागील ऐक्यभाव समर्थ जाणून होते. समर्थ जेव्हा पंढरपुराला गेले तेव्हा विठ्ठल मूर्तीतच त्यांना रामाचे दर्शन झाले. राम, कृष्ण आणि विठ्ठल ऐक्यभावाचे दर्शन घडविणारा समर्थांचा हा अभंग पाहा-
राम अयोध्येचा वासी। तोचि नांदे द्वारकेसी॥1॥
आता भक्तांचियासाठी। उभा चंद्रभागे तटी॥5॥
राम तोचि विठ्ठल जाला। रामदासासी भेटला॥6॥
एथ उभा का श्रीरामा। मनमोहन मेघश्यामा॥1॥
काय केले धनुष्यबाण। कर कटावरी ठेवून॥2॥
रामदासी जैसा भाव। तैसा झाला पंढरीराव॥7॥ समर्थांनी एका अभंगात ‘विठोबा तू आमुचे कुलदैवत।’, ‘विठोबा हे आमुची जननी। भीमातीर निवासिनी।’ असे विठ्ठलाला आई-कुलदैवत म्हटले आहे.
समर्थकृत ‘राममंत्र’ ः हरे राम
सर्व देवकथांमध्ये श्रीरामकथा सर्वश्रेष्ठ आहे. ‘म्हणोनी कथा थोर या राघवाची।’ हा समर्थांचा दृढभाव भक्तीचा आदर्श आहे. समर्थांचा राम एकच असला तरी त्या रामाची कथा त्यांनी अनेकदा, अनेक प्रकारे कथन केलेली आहे. त्यामुळे एका रामावर अनेक प्रकारे रामकथा लिहिणारे समर्थ हे एकमेव संतकवी आहेत. (पंडित कवी मोरोपंत पराडकर यांनी 108 रामायणे लिहिली. अपवाद) समर्थांनी ज्या प्रकारे ज्या जोरकसपणे रामकथा निरूपित केली ती संतसाहित्यातील वीररसाचे व उत्कट भक्तीचे विलोभनीय वैशिष्ट्यपूर्ण दर्शन आहे.
समर्थांच्या राममय साहित्यामध्ये ‘राममंत्र’ नावाची 49 श्लोकांची उत्कट, प्रभावी आणि प्रासादिक काव्यरचना आहे. उपासनाकाळात रामदास स्वामींनी टाकळी येथील गोदावरीच्या प्रवाहात उभे राहून रामनामजपाचे पुनर्श्चरण केले. त्या पुनर्श्चरणाची फलश्रुती म्हणजे समर्थांची ही 49 श्लोकांची ‘राममंत्र’ काव्यरचना होय; असे अभ्यासक म्हणतात. रामोपासनेमध्ये या राममंत्राचे स्थान अनन्य आहे. या राममंत्रातील काही श्लोक पाहू-
नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी।
जडे गर्व ताठा अभिमान पोटी।
कसा कोणता नेणवे आजपा रे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥1॥
दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक व समर्थकृत अनेक रामायणे अभ्यासता आली तर उत्तमच पण ज्यांना ते जमणार नाही त्यांनी समर्थांच्या ‘हरे राम’, ‘हरे राम’ मंत्रांचा जप उपासना करून आपले जीवन धन्य करून घ्यावे.
जय जय रघुवीर समर्थ।
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः नामयोगी गोंदवलेकर महाराज यांचा ‘रामपाठ’)