जेवणाच्या ताटाला निक्कीने लाथाडलं; आर्याचाही केला अपमान; नेटकरी म्हणाले, “हे संस्कार, काय भाषा…”

    24-Aug-2024
Total Views |

big boss  
 
 
मुंबई : मराठी ‘बिग बॉस’चे पाचवे पर्व जरा जास्तच हिंसक झाले आहे असे वाटते. सतत घरातील इतर सदस्यांची लाज, लायकी काढणं सुरुच आहे. आणि यात पहिला नंबर येतो निक्की तंबोळीचा तर दुसरा येतो जान्हवी किल्लेकर हिचा. सध्या घरात निक्की-अभिजीतच्या मैत्रीमुळे अरबाज गेल्या काही दिवसांपासून काहीसा नाराज होता. तर, इरिनाने अरबाजशी मैत्री करणं हे निक्कीला पटलं नसल्यामुळे वेगळेच राडे सुरु होते. आता या दोन्ही गोष्टींमुळे आज संपूर्ण घरात एक वेगळाच ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
 
तर झालं असं की, वैभव, इरिना, जान्हवी, निक्की आणि अरबाज एकत्र बसलेले असतात. यावेळी निक्की इरिनावर प्रचंड संतापते. “इरिनाने अरबाजचं डोकं दाबणं, त्याच्याशी मैत्री करणं हे मला पटत नाही” असं वक्तव्य निक्कीने जाहीरपणे घरात केलेलं आहे. त्यामुळे निक्की म्हणाली की, “बरं झालं ही ( इरिना) नॉमिनेट झाली. बाहेर गेली तरी चालेल ही माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती”.
 
big boss  
 
दरम्यान, निक्कीच्या बोलण्याने वैभव चांगलाच संतापला. तिला “हे अती होतंय” अशी ताकीद देखील वैभव देतो. परंतु, निक्की त्याच्याशी अजून वाद घालू लागते. शेवटी टेबलावर ठेवलेली जेवणाची ताटं देखील निक्की लाथेने उडवते. यानंतर अरबाज निक्कीने लाथेने उडवलेली भांडी उचलत असल्याचं दिसतं.
 
जेवणाच्या दोन ताटांना लाथ मारणारी निक्की काही वेळानंतर आर्याला “जास्त डाळ घेऊन जेवू नकोस…सर्वांना पुरली पाहिजे” असं सांगते. यावर वैद्यकीय कारणांमुळे आर्या जास्त डाळ खात असल्याचं जान्हवी स्पष्ट करते. परंतु, निक्कीने केलेल्या अपमानामुळे ती जेवणाचा एकही घास न खाता तशीच बाल्कनीत निघून जाते.
 
दरम्यान, आर्याला समजवण्यासाठी ‘बी’ टीम बाल्कनीत जाते. यामध्ये केवळ अभिजीत जात नाही. सगळेजण निक्कीने आर्याची माफी मागावी असा मुद्दा पुढे करतात. मात्र, शेवटपर्यंत निक्की कोणाचंही ऐकून घेत नाही.
 
आधी जेवणाच्या ताटाला लाथाडणं आणि त्यानंतर आर्याचा अपमान करणं या दोन्ही गोष्टींमुळे नेटकरी सध्या निक्कीवर प्रचंड संतापले आहेत. “निक्की काहीही बरळत असते”, “बिग बॉस याकडे लक्ष द्या”, “आर्याची माफी मागायला हवी”, “जेवणावरून बोलणं हे कोणते संस्कार आहेत? आणि काय ती भाषा…निक्कीला लाज कशी वाटत नाही”, “आर्याला घरातील लोकांनी जो त्रास दिला तो महाराष्ट्राला आवडला नाही.” अशा कमेंट्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत.