बालकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी!

    24-Aug-2024
Total Views |
child safety in future


बदलापूरच्या त्या दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाला आणि सगळा महाराष्ट्र पेटून उठला, हादरला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण, अशा घटना भविष्यात घडूच नये, यासाठी समाजातील विविध स्तरांतील मंडळींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ‘सुरक्षित शाळा, सुरक्षित बालपण’ या अनुषंगाने नेमके काय करता येईल, त्यासाठी घडवून आणलेले हे विचारमंथन...

मुलं घरानंतर जर कुठे सुरक्षित असतील, तर ती त्यांच्या शाळेत, हे म्हणणे बहुतांशी खरेच. शाळा म्हणजे बालकांचे दुसरे घर आणि शिक्षक म्हणजे दुसरे पालकच! मात्र, कधी कधी काही अप्रिय घटना घडतात, त्या भयंकर घटनांनी समाज हादरून जातो. बदलापूरच्या त्या नामांकित शाळेत दोन अबोध बालिकांवर झालेला अत्याचार पाहून असेच अनेक प्रश्न उपस्थित होतात. जसे बालिकांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना होती? बालिकांच्या शौचालय सफाईसाठी महिला कर्मचारी का नव्हती? किंवा शौचालयात गेलेली बालिका पुन्हा वर्गात आली, तेव्हा शिक्षिकेला त्या बालिकेचा भेदरलेला चेहरा किंवा तीची अस्वस्थता का दिसली नाही? असे एक ना अनेक प्रश्न. संबंधित घटनेमुळे अस्वस्थता अजूनही कायम आहे. न पाहिलेल्या त्या बालिकांचे चेहरे, त्यांचे मनोविश्व डोळ्यांसमोर आणि मनात उभे राहते. अश्रू अनावर होतात. संताप, दुःख तर आहेच. मात्र, घटनेवरून बदलापूरकरांनी दहा तास रेल्वे रुळांवर केलेले आंदोलन लक्षात राहिले. त्या आंदोलनाबाबतही काही लोकांचे म्हणणे की, पालक आणि बदलापूरकरांनी काही तास आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनामध्ये बदलापूरच्या बाहेरचे लोक आले होते. ते दगडफेक करत होते. त्यांनीच शाळेची तोडफोड केली. ‘रेल रोको’ केले. या सगळ्यामुळे संशय वाढतो. लोकांनी आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातले राजकारणही तापले. विरोधी पक्षातील बहुतेक नेत्यांनी या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराला एक संधी म्हणून पाहिले, सत्ताधारी पक्षांविरोधात लोकांना चिथवण्याचे साधन म्हणून पाहिले, असे दिसले. हे खूप क्लेशदायकच.

सत्ताधारी महायुती सरकारने या घटनेबद्दल कारवाई केली नाही का? या घटनेची शासनाने गंभीर दखल घेऊन चौकशी न करता, तो कंत्राटी कामगार नेमल्याबद्दल कंत्राटदारास काळ्या यादीत टाकले. मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आले. शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. तीन पोलीस अधिकार्‍यांना कामातील हलगर्जीपणासाठी निलंबित करण्यात आले. मात्र, तरीही काही दिवसांपूर्वी या घटनेवरून महाविकास आघाडीने बंद पुकारण्याची घोषणा केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने बंदला चपराक दिली म्हणून बंद टळला. मात्र, याबाबत अतिशय संतापजनक बाब म्हणजे, त्या बंदमध्ये सामील व्हा, म्हणत सगळ्या सोशल मीडियावर दोन दिवस खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या की पीडित बालिका मृत पावली आणि हे दुःख सहन न होऊन तिच्या आईने आत्महत्या केली. ही बातमी खोटी होती. खोटी बातमी लिहितानाही दुःख वाटते. संताप येतो. विचार करा, जर हा बंद झाला असता आणि महाराष्ट्रातील 20 टक्के लोकांना जरी ही बातमी खरी वाटली असती आणि ते रस्त्यावर उतरले असते तर? तर समूहाला शिस्त असते का? या समूहाने कायदा हातात घेतला असता तर? होऊ घातलेल्या या अराजकतेचे पाप कोणाच्या माथी असणार होते? कुणी म्हणेल की, या ‘जर-तर’च्या गोष्टी आहेत, बंद तर झालाच नाही. पण, ती न्यायालयाची कृपा. दुसरीकडे असे वाटते की, शाळेकडून अक्षम्य दुर्लक्ष आणि भयंकर चूक झाली आहे. मात्र, कोणत्याही शाळेला, त्यांच्या संचालकांना, मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना कधीच वाटत नाही की त्यांच्या शाळेचे नुकसान व्हावे, बदनामी व्हावी. सांगण्याचा हेतू हा की या सगळ्या प्रकरणात शाळेची तोडफोड झाली, नुकसान केले गेले. संचालक आणि संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक तर आयुष्यभर या दुःखाचे धनी होणार आहेत. त्या सगळ्यांनी अतिशय कष्टाने आणि विश्वासाने शाळा उभारली. अनेक विद्यार्थी या शाळेत घडले. शाळेचा लौकिक अत्यंत चांगला होता. मात्र, कली घुसावा तसा गुन्हेगार या शाळेत आला आणि त्याने भयंकर विकृत गुन्हा केला. बदलापूरमधले अनेक पालक म्हणत आहेत की, शाळेची तोडफोड, नुकसान करून त्यांना काय मिळाले? आमचा शाळेवर विश्वास होता आणि आहे!

बदलापूर येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. महिला व लहान मुली ह्यांच्या विरुद्ध होणार्‍या तक्रारी/गुन्हे याबाबत पोलीस तक्रारदारांशी वागताना सौजन्य आणि संवेदनशीलता दाखवतात का? महिला किंवा बालिकेचे पालक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात तेव्हा पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे की, महिला/पालक तक्रार करायला येतात तेव्हा सर्वप्रथम कोण भेटते, तक्रार लिहून घेण्यास किती वेळ लागतो, तक्रार सांगितल्याप्रमाणे लिहिली जाते का, तक्रारीचे गांभीर्य कमी करून लिहिली जाते का, त्याचप्रमाणे तक्रार जशी सांगितली जाते त्या भाषेत व त्या शब्दात लिहिली जाते का, तक्रार लिहून घेताना दृक-श्राव्य माध्यमाचा उपयोग केला जातो का, तक्रार घेताना लाच मागितली गेली होती का? पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने या गोष्टी स्वतंत्रपणे तक्रारदाराशी संपर्क करून तपासून पाहिल्या का? तशी नोंद ठेवली का? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलीस तक्रारदारांना कसे वागवतात यातून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. पोलिसांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांना परिणामकारक सल्ला देणे, कामात मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण व दृष्टिकोन बदल करण्याच्या उपाययोजना अपेक्षित आहेत.तसेच पोलीसांना संवेदनशिलतेसह प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन ह्यांनी विविध स्तरांवर अपेक्षित कारवाईबद्दल सविस्तर शासन निर्णय नुकतेच पुन्हा प्रसृत केले आहेत. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी अपेक्षित आहे.
-प्रवीण दीक्षित. (निवृत्त पोलीस महासंचालक)


नवीन कायद्यात म्हणजे भारतीय न्याय संहिता या कायद्यानुसार आता बलात्कार पिडीतेचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असल्यास गुन्हेगारासाठी 20 वर्ष सश्रम कारावास किंवा आजीवन कारावास किंवा मृत्युदंड अश्या शिक्षेच प्रावधान देण्यात आलेला आहेण मुलगा असो,मुलगी असो,कि ट्रान्सजेन्डर असो त्यांना मूल या एकाच कक्षेत आणले आहे .कायद्याच्या दृष्टीने आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम जेव्हा बघतो, तेव्हा जाणवते की ती प्रणाली अजूनही फक्त महिलांसाठीच आहे.लहान मुलांवर अत्याचार झाल्यावर त्यांच्यासाठी वेगळी अशी उपाययोजना प्रणाली कार्यान्वित करण्याची गरज आहे .आतापर्यंत फक्त लहान मुलं हरवले किंवा त्याच्या हातून कुठला गुन्हा घडला यावर डजझ आहे.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना काही झाले तर आम्ही शाळा म्हणून जवाबदार राहणार नाही. अशाप्रकारचे फॉर्म भरून घेणार्‍या शाळेसाठी एक कडक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम महाराष्ट्र शासनाने आणावी. जशी नियमावली शाळांसाठी तशीच पोलिसांसाठीही असली पाहिजे. या नियमावलीाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. तसे झाले तर शाळेच्या विरोधात किंवा पोलिसांच्या विरोधात शिस्तपालन समिती असावी. कायद्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी काहीतरी प्रावधान असायला पाहिजे.
-डॉ क्षितिजा वडतकर वानखेडे, संविधान आणि मानवीहक्क तज्ज्ञ


संस्कार नीतिक्षम संस्कृती असणारा आपला समाज पण काही विकृत लोकांमुळे मुलीमहिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपले धर्मनीतीसंस्कारच ही परिस्थिती बदलवू शकेल. सध्या संयुक्त कुटुंबपद्धती नसून एकल कुटुंब ी पद्धत आहे. त्यामुळे वस्तीपातळीवर संस्कारवर्गाची गरज निर्माण झाली आहे. आपले धर्मग्रंथ रामायण, महाभारत आणि महापुरुषांच्या जीवनचरित्राबदद्ल या संस्कारवर्गात मुलांना संस्कारित केले तर खूप फरक पडेल. तसेच संस्कार म्हणून स्वसंरक्षणही शिकवले पाहिजे. जसे कुणी हल्ला केलाच तर त्या पुरुषाच्या कमजोर भागावर हल्ला करून मुलांनी न घाबरता मोठ्याने ओरडणं शिकवलं पाहिजे..दात, नखांचा वापर करून स्वतःची सुटका करून पळ काढणे आणि लगेच या गोष्टी शाळेतील शिक्षक आणि पालकांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. या लहान मुलांना हे सर्व शिकवण, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं आवश्यक आहे. शरीरासोबतच मन आणि बुद्धी सुदृढ करणारेे संस्कारवर्ग प्रत्येक वस्तीत निर्माण व्हायला हवेत.
-शितल निकम, संस्कार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता


घडलेली घटना दुर्देवी आहे पण अशा घटना राजकीय परिक्षेपातून न पाहता सामाजिक भावनेतून घटेनाचा विचार करायला हवा. मला वाटते की मानसिक आणि शारीरीक सुरक्षा यांसदर्भात पालक आणि बालकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण आहे. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या कल्याणसाठीचे सरकार आहे. त्यामुळे पिडीत बालकांना न्याय मिळणारच आणि गुन्हेगाराला कडक सजाही मिळणार.
आ. उमा खापरे, महाराष्ट्र


मुलांना शाळेत टाकले संपली आपली जबाबदारी असे वागून चालत नाही. आपले मूल जिथे शिकते त्या शाळेत काय व्यवस्था आहेत, शाळेत मुलांची काळजी योग्य त्या पद्धतीने घेतली जाते का? मुलांशी संवादस्नेह असणे गरजेचे आहे. केवळ पॅरेंट्स मीटिंगला जाऊन रिकाम्या जागा भरा, असे वागणे सर्वस्वी चुकीचे आहे. बालकांना स्वरंक्षणाचे मानसिक आणि शारीरीक प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे. तसेच बालकाची शाळेसंदर्भात एखाादी तक्रार करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता कामा नयेे. बदलापूरच्या घटनेवरून प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक प्रशन की खरंच वयाच्या 3 र्‍या, 4थ्या वर्षापासून अबोध बालकांना शाळेत घालणे गरजेचे आहे का? दुसरे पालक म्हणून सगळ्या पालकांन एक विनंती, आहे की, आपलं मूल घरी जितकं सुरक्षित असते, तितके ते शाळेत, खासगी शिकवणी आणि छंदवर्गातही असते का? यासंदर्भातली खात्री पालकांनी वेळोवेळी करावी. आपले मुल आपली जबाबदारी.
-सपना कांबळे-साळवी, पालक


एक शिक्षक म्हणून आपल्या वर्गातील सर्व मुलांची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. शाळा प्रशासनानेसुद्धा कर्मचारी नेमताना त्यांच्याविषयीची सर्व आवश्यक माहिती घेऊन मगच त्यांना कामावर नेमले पाहिजे. गुड टच, बॅड टच यासंबंधीचे व्हिडिओ, चित्रफलक विद्यार्थ्यांना दाखवणे. जर त्यांना कुणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर घाबरून न जाता काय करावे, ह्याची माहिती देणे. पालकांसाठी यासंदर्भात सभेचे आयोजन करणे. चाईल्ड हेल्पलाइनचे नंबर पालकांना देणे. मुलांकडून हे नंबर पाठ करून घेणे. पॉस्को कायदा म्हणजे काय? या कायद्याअंतर्गत बालकांचे रक्षण कसे केले जाते, हे पालकांना समजावणे. तसेच पालकांनी आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधणे अतिशय गरजेचं आहे..
- गौरी शिरसाट, शिक्षिका महानगरपालिका, मुंबई


घडलेली घटना मनाला सुन्न करणारी होती. त्यामुळे बदलापूरकर त्या दिवशी गुन्हेगाराला शासन व्हावे आणि पिडीतेला न्याय मिळावा म्हणून सकाळी 6.30 वाजल्यापासून एकत्र जमले. मात्र सकाळी 10 पर्यत कळले की प्रशासन आणि सरकारने घटनेसंदर्भात कारवाई करत आहे. त्यामुळे जमलेले बदलापूरकर पालक पुन्हा आपआपल्या कामाला घरी परतले. मात्र त्यानंतर आम्ही बदलापूरकरांनी आंदोलनाला अनपेक्षितपणे हिंसक वळण मिळताना दिसले. रेल्वे रूळावर थांबून दगडफेक करणारे शाळेची तोडफोड करणारे हे कोण होते माहिती नाही. कारण असे करणे हा स्थानिक बदलापूरकरारंचा स्वभावच नाही. तसेच बदलापूरचे आणि शाळेचे आत्मीय नाते होते. घटना खूप वाईट घडली आणि त्यात संबंधितांची चुकही अक्षम्य आहे.या घटनेवर कारवाई होताना दिसत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि यापूढे अशी एकही घडू नये यासाठी सरकाार प्रशासन पालक शाळा समुहांनी डोळयात तेल घालून काळजी घ्यावी. 
-केतकी चांदेकर, बदलापूर, गृहिणी


शाळेतील सगळ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्यांची सुरक्षा आणि कल्याण वाढवण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो आणि यामुळे नक्कीच आपण परिस्थिती हाताळू शकतो.
 
सुरक्षेचे उपाय :


1. शालेय पायाभूत सुविधा सुरक्षित करा: योग्य प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षित प्रवेश/निर्गमन बिंदू सुनिश्चित करणे.
2. प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती : शिक्षक, प्रशासक आणि सहायक कर्मचार्‍यांना लैंगिक संवेदनशीलता, बालसंरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर शिक्षित करणे.
3. शून्य-सहिष्णुता धोरण : गुंडगिरी, छळ आणि हिंसाचार विरुद्ध कठोर नियम लागू करणे.
4. समुपदेशन सेवा : भावनिक समर्थन आणि मार्गदर्शनासाठी प्रवेशयोग्य समुपदेशन सेवा प्रदान करणे.
5. विद्यार्थी सुरक्षा समिती : सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करणे.
6 नियमित सुरक्षा कवायती : स्व-संरक्षण, आपत्कालीन प्रतिसाद आणि सुरक्षा प्रोटोकॉलवर नियमित सुरक्षा कवायती आणि कार्यशाळा यांचे आयोजन करणे.
7. खुल्या संवादाला आणि घटनांचे अहवाल देण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. सुरक्षा, शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम यांचे आयोजन करावे.
सावधानता उपाय :
1. पार्श्वभूमी तपासणे : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासणी करण्यात यावी
2. व्हिजिटर मॅनेजमेंट: आयडी व्हेरिफिकेशन आणि व्यवस्थापन धोरणे लागू करावीत.
3. विद्यार्थी पर्यवेक्षण : मधली सुट्टी, दुपारचे जेवण आणि संक्रमण कालावधीदरम्यान पुरेसे पर्यवेक्षण करण्यात यावे.
4. वाहतूक सुरक्षा : शाळेच्या बसेस आणि अधिकृत खाजगी वाहनांसह सुरक्षित वाहतूक पर्यायांची खात्री करावी.
5. शाळा सुसंवाद : चिंता दूर करण्यासाठी आणि सुरक्षितता माहिती देण्यासाठी पालक/विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद वाढवला पाहिजे.
या उपायांची अंमलबजावणी करून, आपण आपल्याच विद्यार्थिनींच्या भरभराटीसाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करू शकतो.
- भारती रुळे, मुख्याध्यापिका, चार्टर्ड इंग्लिश स्कूल ऐरोली, नवी मुंबई

शाळांमध्ये मुख्याध्यापकांपासून ते प्रत्येक शिक्षकाने समुपदेशन प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. वद्यार्थी बालक कधी कौटुंबिक समस्यांमुळे, तर कधी अभ्यास, मित्र, सामाजिक घटक, आर्थिक स्थिती यामुळे त्रस्त असते. वर्गखोलीतही मूल्यमापनाच्या स्पर्धेत ते अडकते. त्यात मुलांची प्रत्येक टप्प्यावर होणारी शारिरीक, मानसिक, भावनिक व बौद्धिक वाढ, शरिरातील जैविक व रासायनिक बदल यांमुळे मुलांचा आत्मिक गोंधळ होत जातो. अशा वेळी समुपदेशनातून मुलांना सावरणे शक्य होते. आपण एकटे नाही आपल्या सोबत पालक आणि शाळा आहे, आपल्याला त्रास देणार्‍या व्यक्ति घटकांवर पालक आणि शाळा ताबोडतोब काारवाई करतील अशी खात्री विद्यार्थ्यांना समुपदेशनातून निर्माण करणे गरजेचे आहे. दुसरीकडे शालेय संचालक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठीही समुपदेशन आवश्यक आहे. कारण शाळेतील बालंकाच्या संस्कार आणि सुरक्षेप्रती सर्वोच्च जबाबदारी त्यांची आहे. त्यानुसार शाळेचे अंतर्बाह्य वातावरण त्यांनी निर्माण करायल हवे.
- संगीता पाखले,शालेय समुपेदशक
 
 
शाळा प्रशासनाने एखाद्या कर्मचार्‍याची नेमणूक करताना त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शाळेत सी. सी. टीव्ही, कॅमेरे असणे महत्त्वाचे आहे. तसेच मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणे महत्त्वाचे आहे, त्यांचा सांभाळ, मुलींना प्रसाधनगृहात नेण्यासाठी महिला सेविकेची नेमणूक होणे महत्त्वाचे आहे. तसेच वर्गातील शिक्षिकेने पण एखादी विद्यार्थिनी नैसर्गिक विधीला गेली असेल तर पुन्हा वर्गात येते त्यावेळेस जास्त वेळ लागला तर तिला वैयक्तिकरित्या जवळ बोलावून विचारपूस केली पाहिजे. शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांचे सर्व शाळेच्या घड़ामोड़ींवर लक्ष असणे महत्त्वाचे आहे. तरच ह्यासारख्या कृत्यांना आळा बसू शकतो.
-वर्षा हांडे-यादव, शिक्षिका, अध्यक्ष विबोधी फाऊंडेशन
 
 
9594969638