मुंबई : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता मुंबईत उबाठा गटाने निषेध आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना भवनासमोर भर पावसात हे आंदोलन सुरु झाले असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेकजण यात सहभागी झाले आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतू, उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी हा बंद मागे घेण्याची घोषणा केली.
दरम्यान, आता मविआच्या नेत्यांकडून राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना भवनासमोर उबाठा गटाने या निषेध आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच पुण्यात शरद पवार गटाकडूनही निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात भर पावसात या निषेध आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.