गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर. त्यामुळे मूर्तिकारांचीही कारखान्यात लगबग वाढली असून, मूर्त्यांवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. याच व्यस्ततेत मुंबईतील ख्यातनाम मूर्तिकार विजय खातू यांचा मूर्तिकलेचा वारसा पुढे यशस्वीपणे चालवणार्या त्यांच्या कन्या रेश्मा खातू यांची भेट घेतली. त्यांच्याशी मूर्तिकारांसमोरील आव्हाने, या क्षेत्रातील महिलांचा सहभाग यांसारख्या विषयांवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
वडिलांच्या निधनानंतर त्यांची ही मूर्तिकलेची परंपरा पुढे चालवण्याचा निर्धार तुम्ही केला. तेव्हा या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी किंवा ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी हे क्षेत्र फक्त पुरुषांचं आहे, असं समजलं जायचं. तर, हा समज मोडीत काढताना आणि ही जबाबदारी हाती घेताना तुमच्या काय भावना होत्या?
खरं तर वडिलांच्या निधनानंतर वडिलांची ही मूर्तिकलेची जबाबदारी अचानक माझ्यावर आली. 2017 मध्ये त्यांचे हे काम मी हाती घेतलं. वडिलांची या क्षेत्रात जागा घेण्याची माझी कोणतीही इच्छा नव्हती, पण त्यांचं नाव मोठं करण्याची इच्छा कायम होती. आता तर त्यांची ही परंपरा पुढे चालू ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य पार पाडण्याचा मी प्रयत्न करत आहे. मंडळांचेही खूप मोठे सहकार्य ही जबाबदारी सांभाळताना मला लाभले.
या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हाला मूर्तिकला कला अवगत होती की तुम्ही नंतर ती आत्मसात केली?
माझं क्षेत्रचं वेगळं होतं. त्यामुळे मला साहजिकच ही कला अवगत नव्हती. पण, ‘मूर्तिकाराची मुलगी’ असल्यामुळे ती कला माझ्या रक्तातच होती. ही जबाबदारी हातात घेतल्यानंतर ही कला मी आत्मसात केली आणि गेल्या सात वर्षांत मी या क्षेत्रातले बारकावे समजून घेतले आणि अजूनही मी शिकते आहे.
विजय खातू यांचं मूर्तिकलेच्या क्षेत्रात मोठं नाव आणि तितकचं मोलाचं योगदान. खातू यांची मूर्तिकलेची एक वैशिष्ट्यपूर्ण शैलीही होती. तेव्हा तुम्ही मूर्ती घडवण्याचं काम हाती घेतल्यानंतर, तुम्ही स्वत:ची अशी वेगळी शैली कशी निवडली होती का?
विजय खातूंनी जे काम केलं ते सर्वोत्तमच होतं. आजही त्यांचे जे शिष्य आहेत, जे त्यांच्याकडून शिकून गेले आहेत, त्या शिष्यांकडेसुद्धा ‘विजय खातू पॅटर्न’च्या मूर्त्यांची मागणी केली जाते. माझं इतकं धाडस नाही की मी ती शैली बदलेन. त्यामुळे इतर मूर्तिकार आणि मी स्वत:सुद्धा अजूनही त्यांच्याच शैलीने काम करतो.
मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो, तेव्हा त्या मूर्तीचं अंतिम रूप डोळ्यांसमोर ठेवूनच ती घडवली जाते की ती घडवताना आपसुकचं मूर्तीचं स्वरुप उमगत जातं?
मूर्तिकाराला मूर्ती घडवता घडवता तिचे अंतिम स्वरूप कसं असावं, हे उमगत जातं. पण, आताच्या काळात बरेच मूर्तिकार मी असे पाहते की, ती मूर्ती कशी दिसेल, समाजमाध्यमांवर कशी प्रसिद्ध होईल, या दृष्टीने ती कशी असली पाहिजे, याचा विचार करून मूर्त्या घडवल्या जातात. बरेच नवोदित मूर्तिकार असं करतात. पण, मला असं वाटतं की, मूर्तीमध्ये लोकांच्या भावना असतात, भक्ती असते आणि त्याचा विचार करूनच ती बनवली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती त्यामध्ये होता कामा नये.
मातीला आकार देऊन किंवा तो साचा बनवून मूर्ती तर घडवली जाते; पण त्यात भाव निर्माण करण्यासाठी मूर्तिकार काही वेगळा प्रयत्न करतात का?
मूर्तिकारांच्या मनातील श्रद्धा मूर्तीमध्ये प्रतिबिंबित होत असते. कुठलाही कलाकार मग ते मातीपासून मूर्ती घडविणारे असोत किंवा इतर माध्यमांतून मूर्ती घडविणारे कलाकार असोत, ते भावनिक असतात आणि त्यांच्या भावनेतूनच मूर्ती घडत असते.
हल्लीच्या काळात मूर्तिकारांसमोरील सगळ्यात मोठं आव्हान काय आहे, असं तुम्हाला वाटतं?
मूर्तिकारांसमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे जागांची उपलब्धता. मुंबईत ‘बेस्ट’चे मीटर जे लावले जातात, ते मूर्तिकलाकारांसाठी कमर्शियल दराने न लावता स्थानिक दराने लावले गेले तर ते मूर्तिकारांसाठी फायद्याचे ठरेल.
मूर्तिकार जितकी या व्यवसायात गुंतवणूक करतात, त्या तुलनेत त्यांना अपेक्षित नफा मिळतो का?
आधी मूर्तिकारांमध्ये इतकी स्पर्धा नव्हती, पण आता गल्लोगल्ली मूर्तिकार झालेले आहेत. एका कारखान्यातून शिकून दहा मूर्तिकार तयार होतात आणि पुढे आणखी दहा, अशी ही संख्या वाढतच जाते. त्यामुळे मूर्तिकारांमधील स्पर्धाही वाढली आहे. मूर्तिकारांमधील ही स्पर्धा मंडळांना कळते आणि मंडळेही त्याचा फायदा घेतात. त्यामुळे खूप मूर्तिकारांचे नुकसान आधीही झालेले आहे आणि आताही होत आहे. कोरोनानंतर तर मूर्तिकारांची परिस्थिती आणखीही बिकट झाली आहे, असे मी म्हणेन.
जिथे या मूर्ती बनवल्या जातात, ते कारखाने गणेशोत्सवाच्या काही महिने आधीपासून जागोजागी पाहायला मिळतात. पण, वर्षभर मूर्तिकार गणेशोत्सवाची तयारी कशाप्रकारे करत असतात?
नवरात्रोत्सवानंतर वेध लागतात ते माघी गणेशोत्सवाचे. त्यावेळी मूर्तिकारांची बोलणी सुरू होतात. काय करायचं, काय संकल्पना ठेवायची, याची चर्चा सुरू होते. माघी गणेशोत्सवात आमच्याकडे फार काम नसतं. खूप मोजक्या आणि नावाजलेल्या मंडळांच्या मूर्तीच आम्ही साकारतो. त्यावेळी खूप कमी मूर्ती तयार करायच्या असतात, पण तेव्हापासूनच या वर्षी मंडळांना काय वेगळं देता येईल, काय वेगळं करता येईल, याचा विचार सुरू असतो. म्हणजे, मुख्य काम हे तीन-चार महिन्यांचे असते, पण त्याचा विचार, त्याची तयारी आणि त्यासाठी लागणारी मेहनत ही वर्षभर करावी लागते.
पीओपी की शाडू मातीची मूर्ती, हा दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रामुख्याने चर्चेत येणारा मुद्दा. त्याविषयी तुमचं मत काय?
गणेशोत्सव हा आपला उत्सव आहे, हे कोणीही विसरू नये. मातीपासून मूर्ती तयार करणार्या कलाकारांचा मला आदर आहे आणि पीओपीपासून मूर्ती तयार करणार्या कलाकारांचाही मला तितकाच आदर आहे. ज्याला जसं शक्य आहे, त्याने तशी मूर्ती बनवावी. एखादी गोष्ट बंद करून प्रदूषण थांबवू शकतो का, हा अभ्यासाचा विषय आहे. फक्त कोणतीही गोष्ट जेव्हा बंद केली जाते, तेव्हा त्याला तितकाच सक्षम पर्याय असणं तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे मातीपासून मूर्ती तयार करणारे कलाकार आणि पीओपीपासून मूर्ती तयार करणारे कलाकार, अशा दोन गटांमध्ये हा उत्सव विभागला जाऊ नये. हा आपला उत्सव आहे, त्यामुळे सगळ्यांनीच हातभार लावून हा उत्सव मोठा करावा.
मूर्तिकलेच्या या क्षेत्रात तुलनेने आजही महिलांचं प्रमाण कमी असण्यामागचं कारण काय आहे, असं तुम्हाला वाटतं?
या क्षेत्रात माझाही जो प्रवेश झाला, तो एका जबाबदारीमुळे झाला. या क्षेत्रात येण्यासाठी खूप आत्मविश्वास लागतो, हिंमत लागते. म्हणजे, मी स्वत: या क्षेत्रात कार्यरत असले, तरीही माझ्या हाताखाली काम करणारे सगळे पुरुषच आहेत. त्यात एकही महिला नाही. त्या सगळ्यांना सांभाळून घेऊन मला काम करावं लागतं. मलाही खूप ‘ट्रोलिंग’ सहन करावी लागले. माझं ध्येय मी ठरवलं होतं. या कार्यशाळेला कोणत्या उंचीवर न्यायचं, हे मला माहिती होतं. हे सगळं एक स्त्री करू शकत नाही, असा समज आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे.
ज्या महिला मूर्तिकलेच्या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
आमच्या वडिलांनी 75 वर्षे काम करून इतकं मोठं नाव कमावलं. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा हे सगळं आलं, ते आयतं आलं, असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. हे सगळं मी लहानपणापासून बघत होते. व्यवस्थापनाच्या बर्याच गोष्टी मी ऐकत होते, शिकत होते. त्यामुळे हा डोलारा मी सांभाळू शकले. पण, एवढं सगळं असूनसुद्धा मला या क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागला. गेली सात वर्षे काम करताना खूप अडचणीसुद्धा आल्या. ‘रेश्मा विजय खातू’ या माझ्या नावामध्ये ‘विजय खातू’ असूनसुद्धा मला संघर्ष करावाच लागला. त्यामुळे तुम्हाला जर या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल, तर शून्यापासून सुरुवात करावी लागेल. खूप गोष्टी शिकाव्या लागतील आणि खूप संघर्ष करावा लागेल. या सगळ्याची तयारी करूनच या क्षेत्रात प्रवेश करा; तरच तुम्ही या क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करू शकता.