काठमांडू : नेपाळ येथील बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आहे.
शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली. या बस अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची मंत्री रक्षा खडसे यांनी काठमांडू येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली.
नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांच्यासोबत अपघातात जखमी झालेल्या आणि सध्या त्रिभुवन विद्यापीठाच्या अध्यापन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १६ भारतीय नागरिकांची रक्षा खडसेंनी भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी शोध आणि बचाव कार्यासाठी तसेच जखमींच्या उपचारासाठी तत्पर आणि वेळेवर मदत केल्याबद्दल नेपाळ सरकारचे आभार मानले.