मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Convocation Ceremony) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाऐवजी भारतीय पोशाख अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयात देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये, विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना काळा गाऊन आणि काळी टोपी घालण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, काळा गाऊन आणि टोपी घालणे हे भारतीय संस्कृतीला अनुसरून नाही. दीक्षांत समारंभात परिधान केला जाणारा पोशाख हा त्या राज्यातील पोशाख आणि परंपरांवर आधारित असावा. आता हा वसाहतवादी वारसा बदलण्याची गरज असल्याचे निर्देशात म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, सध्या मंत्रालयाच्या विविध संस्थांकडून दीक्षांत समारंभात काळा गाऊन आणि टोप्या वापरल्या जात आहेत. या ड्रेसचा ट्रेंड युरोपमध्ये मध्ययुगात सुरू झाला. पुढे तो ब्रिटिशांच्या माध्यमातून वसाहतीत देशांत पसरला.
सरकारच्या निर्णयामुळे भारतातील शैक्षणिक संस्था आता आपली संस्कृती आणि परंपरा दाखवू शकणार आहेत. आरोग्य मंत्रालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना त्यांच्या संस्थांच्या दीक्षांत समारंभासाठी योग्य भारतीय ड्रेस कोड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा ड्रेस कोड राज्यातील स्थानिक परंपरांवर आधारित असावा, असे म्हटले आहे.