मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (British Muslim Fatwa) बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बांगलादेशी हिंदूंना टार्गेट करत त्यांच्यावर हल्ले केले. हिंदू महिलांवर अमानुषपणे अत्याचार झाले, मंदिरांवरील हल्ले करण्यात आले. बांगलादेशातील या नरसंहार आणि हिंसाचाराच्या विरोधात लंडन येथील 'असोसिएशन ऑफ ब्रिटीश मुस्लिम' ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकताच त्यांनी यासंदर्भात एक फतवा जारी केला असून हा फतवा स्मरण करून देतो की, असे वर्तन केवळ नैतिकदृष्ट्याच नाही तर धार्मिकदृष्ट्याही निंदनीय आहे.
हे वाचलंत का? : वायनाड पूरग्रस्तांना गोवा राजभवनाची मदत
त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्कॉटिश हिंदू फाउंडेशनने आम्हाला जाणीव करून दिली की बांगलादेशी हिंदू समुदायाला कशाप्रकारे लक्ष्य केले जात आहे. इस्लामच्या नावाखाली बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सदस्यांना लक्ष्य करणारी कोणतीही कृती केवळ न्याय आणि मानवतेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत नाही तर मूलभूत इस्लामिक शिकवणींचेही उल्लंघन करते. जीवनाचे रक्षण करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. निष्पाप व्यक्तींवरील हिंसाचाराचे कृत्य हे एक गंभीर पाप असून तो इस्लामच्या मूल्यांचा अपमान आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेल्या अत्याचाराचा सर्व मुस्लिमांनी सक्रियपणे विरोध केला पाहिजे. तेथील हिंदू समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे बांगलादेशातील मुस्लिमांचे कर्तव्य आहे. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करणे हे आपल्या तत्त्वांचे घोर उल्लंघन आहे. अशा अन्यायाविरुद्ध मुस्लिमांनी उभे राहणे अत्यावश्यक आहे. आपल्या सहमानवांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध उभे राहणे आपले कर्तव्य आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायाला पाठिंबा देणे हे धार्मिकतेचे कार्य आहे.
'असोसिएशन ऑफ ब्रिटीश मुस्लिम'ने बंगाली मुस्लिम संघटनांसह सर्व बंगाली मुस्लिमांना बांगलादेशातील हिंदूंपर्यंत सक्रियपणे पोहोचण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सर्व समुदायांनी एकमेकांना संरक्षण दिले पाहिजे आणि परस्पर आदर व समजुतीवर आधारित त्यांचे राष्ट्र आणि समुदाय तयार करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. हे अत्यावश्यक आहे की आपण सर्व धर्मीय समुदाय या नात्याने अशा समाजाची निर्मिती करण्यासाठी एकत्र काम करू, ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक भय आणि छळापासून मुक्त शांततेत जगू शकतील.