अलीकडच्या काही वर्षांत पॉड टॅक्सी या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत असताना, एक शाश्वत पर्याय असल्याने या टॅक्सीनिर्मिती बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे. पॉड टॅक्सीला ‘पर्सनल रॅपिड ट्रान्झिट’(PRT) सिस्टीम’ म्हणूनही ओळखले जाते.
भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहतूक आणि दळणवळणासाठी वापरात असणार्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. अशावेळी मेट्रो, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प भारतात वेगात उभारले जात असताना, आता पॉड टॅक्सी सुविधा उभारण्याकडे भारताचा कल आहे. देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी तर हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू देखील केली आहे. त्यानिमित्ताने पॉड टॅक्सी हा प्रकल्प जागतिक पातळीवर किती यशस्वी ठरला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरावे.
अलीकडच्या काही वर्षांत पॉड टॅक्सी या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत असताना, एक शाश्वत पर्याय असल्याने या टॅक्सीनिर्मिती बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे. पॉड टॅक्सीला ‘पर्सनल रॅपिड ट्रान्झिट’(PRT) सिस्टीम’ म्हणूनही ओळखले जाते. ही स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहने आहेत, जी समर्पित ट्रॅकसह लहानलहान ग्रुपमध्ये प्रवाशांची वाहतूक करतात. वाहतूककोंडी कमी करत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहतुकीचा एक सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेमुळे पॉड टॅक्सीला मागणी वाढते आहे. पॉड टॅक्सी सामान्यत: दोन ते सहा प्रवाशांसाठी एका समर्पित मार्गासह डिझाईन केलेली असतात. पॉड टॅक्सींची संकल्पना ‘पॉईंट-टू-पॉईंट’ वाहतूक सेवा प्रदान करण्याभोवती फिरते जी कार्यक्षम, सोयीस्कर आणि पर्यावरणास अनुकूल आहे. नियुक्त स्थानकांवर प्रवासी सहजपणे या वाहनांमध्ये प्रवेश करू शकतात आणि मध्यवर्ती थांब्यांची गरज न पडता, ही प्रणाली जलद आणि त्रासमुक्त वाहतूक सुनिश्चित करते.
आज जगभरात कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी शाश्वत पर्याय शोधण्याकडे कल आहे. हे पाहता पॉड टॅक्सीसारख्या शाश्वत वाहतुकीच्या पर्यायांची मागणी वाढत आहे. जलद शहरीकरण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडताना दिसते. पॉड टॅक्सी शहरी गतिशीलतेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक व्यवहार्य उपाय प्रदान करतेच, शिवाय वाहतुकीचे सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग शहरांमध्ये प्रदान करते. जगभरात उत्तर अमेरिका पॉड टॅक्सी मार्केटमध्ये आघाडीवर आहे. उत्तर अमेरिकेची या क्षेत्रात संशोधन आणि विकासामध्ये लक्षणीय गुंतवणूक आहे. विशेषतः यूके विविध शहरांमध्ये प्रायोगिक प्रकल्प आणि पॉड टॅक्सी प्रणालीच्या चाचणीचा साक्षीदार आहे.
यासोबतच युरोपीय देश शहरी गतिशीलतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पॉड टॅक्सीसह टिकाऊ वाहतूक उपाय स्वीकारताना दिसतात. जर्मनी, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्ससारखे देश पॉड टॅक्सी या वाहतूक व्यवस्थेच्या संशोधन, विकास आणि वापराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. आशिया-पॅसिफिक प्रदेश हे उच्च लोकसंख्येची घनता आणि वाढत्या शहरीकरणासह पॉड टॅक्सी बाजारासाठी प्रचंड वाढीच्या संधी सादर करणारे आहे. चीन, भारत आणि जपान यांसारखे देश त्यांच्या वाढत्या शहरी लोकसंख्येची पूर्तता करण्यासाठी प्रगत वाहतूक प्रणाली विकसित करण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्पांत गुंतवणूक करीत आहेत, तर, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व हे प्रदेश हळूहळू पॉड टॅक्सीच्या संभाव्यतेचा शोध घेत आहेत. ब्राझील, मेक्सिको आणि संयुक्त अरब अमिराती पॉड टॅक्सी नेटवर्कची अंमलबजावणी करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प आणि व्यवहार्यतेचा अभ्यास करत आहेत.
भारतात सर्वप्रथम उत्तर प्रदेशने पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यास संमती दर्शवली. उत्तर प्रदेशमधील प्रकल्प हा 14.1 किमी लांबीचा असून अंदाजे 810 कोटी रुपये खर्चून उभारला जाईल. हा प्रकल्प नोएडाच्या 28, 29, 31 आणि 32 सेक्टरमधून जाईल आणि पुढे जेवर विमानतळावरून फिल्मसिटीला जोडला जाईल. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईत मुख्य आर्थिक केंद्र असणार्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा हा 8.8 किमी लांबीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे एक हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे आता जागतिक पातळीवर उपलब्ध असणार्या वाहतूक सुविधा लवकरच भारतातही नागरिकांच्या पसंतीस उतरतील, यात शंका नाही.