आशयघन रचनांचा मळा - बहिणाबाईंच्या कविता

    23-Aug-2024
Total Views |
 

Bahinabai 
 
मानवी जीवनाचे सार आपल्या साध्या, सोप्या, रसाळ भाषेत सांगितले, अशी ही लोकमाता, भूमींकन्या, निसर्गकन्या बहिणाई म्हणजेच बहिणाबाई चौधरी. आज बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आशयघन काव्यरचनांचा अर्थ उलगडणारा हा लेख...
 
ज्या कालखंडात दिग्गज कवींच्या काव्यास्वादात रसिकवाचक रंगून गेले होते, त्याच सुमारास खानदेशातील एका शेतकरी कुटुंबातील एक अडाणी स्त्री जात्यावर दळता दळता, शेतात काम करता करता संसाराची गाणी गात होती. अक्षरगंध नसलेल्या या स्त्रीने मौलिक आणि आशयघन असा काव्यरूपातील हंडा महाराष्ट्राला बहाल केला. मानवी जीवनाचे सार आपल्या साध्या, सोप्या, रसाळ भाषेत सांगितले, अशी ही लोकमाता, भूमींकन्या, निसर्गकन्या बहिणाई म्हणजेच बहिणाबाई चौधरी. आज बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आशयघन काव्यरचनांचा अर्थ उलगडणारा हा लेख...
 
बहिणाबाईंच्या कवितेत विविध भावभावनांचा आविष्कार आहे. पतीच्या निधनानंतर बहिणाबाईंना कविता स्फुरली असावी. पतीच्या निधनाचे दु:ख ही त्यांच्या कवितेतील प्रारंभिक अवस्था असली तरी पुढे त्यांच्या रचनांचा विचार यष्टीपासून समष्टीपर्यंत विकसित झालेला दिसतो. बहिणाबाईंच्या कवितेचा पहिला श्रोता त्यांचा मुलगा सोपानदेव हा होता. सोपानदेव स्वत: सांगतात, “मी मराठी शाळेत असताना माझ्या आवडीचा घडा ‘सावित्रीचे चातुर्य’ मोठ्या ऐटीत वाचत होतो. आई माझ्याजवळ येऊन लक्षपूर्वक ऐकत होती. मला वाटले, माझ्या अशिक्षित आईला त्यातले काय कळणार? त्यानंतर सकाळी रामप्रहरात आई दळायला उठली. जात्याच्या घरघरीबरोबर तिच्या ओठांतून बाहेर पडणार्‍या मंजूळ ओव्या माझ्या कानी पडताच मी तिच्या मांडीवर डोके ठेवून पडलो. आई ओव्या गात होती.
 
सायत्री सायत्री
सत्येवानाची सावली
निघे सत्यवान
त्याच्या माघ्ाून घावली
 
 
दळण सरल्यावर मी आईला विचारले, “या ओव्या तुला कुणी शिकवल्या?” त्यावर ती म्हणाली, “कालदी तुनं माले घडा वाची दाखवला, त्याचज गानं माह्या मनानं मी म्हनत व्हती!” रामप्रहरी जात्यावर दळता दळता त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या ओव्या पुढे सोपानदेव टिपून घेऊ लागले. जात्यातून पीठ सहज पडावे, तशा त्यांच्या रचना घडत गेल्या. त्यांचे चिंतनशील सजग मन विविध घटकांचे, प्रसंगांचे, मानवी प्रवृत्तींचे, जीवनव्यवहाराचे निरीक्षण करीत होते. या निरीक्षणातून त्यांची कविता फुलत गेली. त्यांच्या कित्येेक रचनांना तुकोबांच्या रचनांप्रमाणे सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे. बहिणाबाई आपल्या रचनांमागे ईश्वरी प्रेरणा असल्याचे नमूद करतात. ‘माझी माय सरसोती’ या कवितेतून त्यांच्या काव्यनिर्मितीचे रहस्य उलगडते.
 
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली!
 
इ. स. १८८०च्या नागपंचमीला बहिणाबाई चौधरींचा जन्म जळगाव शहरापासून अवघे दोन मैलांवर असलेल्या आसोदे या गावी झाला. बहिणाबाईंचे वडील उखाजी (उखर्डू) हे गावचे महाजन होते. साहजिकच त्यांच्या घराण्याला गावात प्रतिष्ठा होती. ते कर्तृत्ववान होते. त्यांचा व्यवहार स्वच्छ होता. घरी नेहमीच येणार्‍या जाणार्‍यांची रीघ लागलेली असे. बहिणाबाई म्हणतात, 
 
बापाजीच्या हायलीत
येती शेट शेतकरी
दारी खेटरांची रास
घरी भरली कचेरी
 
आईविषयी त्या सांगतात-
 
माय भीमाई माऊली
जशी आंब्याची साऊली
 
बहिणाबाईंचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी जळगावच्या नथूजी खंडेराव चौधरींबरोबर झाला. माहेराप्रमाणेच सासरचे घराणेही प्रतिष्ठित होते. सासरी सर्व कुटुंब एकत्र राहत होते; पण लवकरच ते कुटुंब विभक्त झाले. वाटण्या झाल्या. वाट्याला आलेल्या घरात, मिळालेल्या मोजक्या जमिनीवर कष्ट करत बहिणाबाई पतीसह राहू लागल्या. दोन-तीन वर्षांनी दुष्काळ पडला. दुष्काळाच्या काळात त्यांना खडी फोडण्याचे कामही करावे लागले. खडतर अशी जीवनाची वाट त्यांच्या वाट्याला आली.
बहिणाबाईंना दोन मुले आणि एक मुलगी झाली. ओंकार, सोपान आणि काशी. दुर्दैवाने तिशीच्या आतच त्यांच्यावर वैधव्याची आपत्ती कोसळली. त्या काळात स्त्रीचा आधार म्हणजे पतीच असे. जोडीदार गेला म्हणजे संसाररथाचे एक चाकच निखळले.
 
अरे रडता रडता
डोये भरले भरले
आसू सरले सरले
आता हुंदके उरले!...
सांग सांग धर्ती माता
अशी कशी जादू झाली
झाड गेलं निंघीसनी
मांघे सावली उरली!
 
बहिणाबाईंना आता जगायचे होते ते मुलांसाठी.
 
देव गेले देवाघरी, आठी ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जीवा
 
असा स्वत:ला धीर देऊन त्यांनी जीवन मार्ग पुढे आक्रमित केला; पण बहिणाबाईंवर संकटेच अधिक आली. त्यांची मुलगी काशी हिचे लग्न बालवयात झाले. तिला सासरी फारसे सुख लाभू शकले नाही. मोठा मुलगा ओंकार हा प्लेगमधून वाचला; पण दिव्यांग झाला. ओंकारच्या पत्नीलाही संसार सावरण्यासाठी कष्ट करावे लागले. ही सगळी संकटे बहिणाबाईंनी एकट्याने पचवली.
 
सोपानदेवांनी पत्नी लीलादेवींबरोबर नाशिकला बिर्‍हाड केले. तिथे बहिणाबाई जात असत. तिथे बहिणाबाईंना लक्ष्मीबाई टिळक, जानकीबाई साठे अशा मोठ्या व्यक्तींशी परिचय झाला. त्या परिचयातून, चर्चेतून बहिणाबाईंचे काव्य अधिक फुलले. संकटांना दूर सारताना त्या स्वत:च्या मनाला समजावत- 
रडू नको माझ्या जीवा
तुले रड्याची रे सव
रडू हासव जरा
त्यात संसाराची चव
 
तरीही अनेकदा कर्जबाजारीपणामुळे त्यांचा जीव व्यथित व्हायचा. हातातोंडाची गाठ जोडताना पांडुरंगाला त्या म्हणतात,
 
अरे पांडुरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपाआड येतं
सावकाराचं रे सोंग
 
पण, बहिणाबाईंच्या संघर्षातही सकारात्मक पैलू जाणवतो. तळागाळातील माणसांच्या दु:खाचा, वेदनांचा वेध त्या घेतात. परमेश्वरावर डोळस श्रद्धा ठेवतात; पण त्यापेक्षा अघिक विश्वास आपल्या कर्तृत्वावर ठेवतात. दि. ३ डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाईंनी इहलोकाचा निरोप घेतला. या थोर कवयित्रीची गोड, परंतु परखड भाष्य करणारी बरीचशी गाणी सोपानदेव व त्यांचे मावसबंधू पीतांबर चौधरी यांनी टिपून ठेवली होती. ते हस्तलिखित सोपानदेवांना आईच्या निधनानंतर सापडले आणि त्यांनी ते आचार्य अत्रे यांच्याकडे नेले. “अहो, हे बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं, हा गुन्हा आहे.” असे अत्रे त्या कविता चाळताच भावनावश होऊन ओरडले. 1952 मध्ये ‘बहिणाईची गाणी’ची पहिली आवृत्ती निघाली आणि महाराष्ट्राला काव्यरूपी मोहरांचा हंडा मिळाला.
 
बहिणाबाईंची कविता ही त्यांच्या जीवनाचा आरसा आहे. वैधव्याची आपत्ती कोसळल्यावर भविष्याचा वेध त्या घेतात; पण त्यांची पद्धत निराळी.
लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुंकू
रेखा उघडी पडली
 
पती गेल्यावर धनाचा झराही आटला. कष्टांना सीमा राहिली नाही.
 
देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन-रेखाच्या चर्‍यानं
तयहात रे फाटला’
 
मात्र, गावात आलेल्या ज्योतिष्याला बहिणाबाई स्पष्ट सांगतात,
 
नको नको रे ज्योतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ!
 
खोट्या आशेच्या आहारी न जाता कष्टावर, वास्तवावर त्यांचा विश्वास आहे. बहिणाबाईंचा आत्मविश्वास दांडगा आहे.
 
जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटे मंगयसूतर
उरे गयाची शपत
 
जीवनसाथी निघून गेला असला तरी मनगटात जोर असल्याचे, म्हणजे मुलांसाठी कष्ट करून जगण्याची हिंमत असल्याचे त्या सांगतात आणि सांत्वन करणार्‍या आयाबायांना आपली कीव न करण्याविषयी स्पष्ट सांगतात.
 
नका नका आयाबाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा माले जीव
 
संसार हा काय असतो, ते समजून घ्यावे ते बहिणाबाईंकडून. सुखाला नकार आणि दु:खाला होकार देणारा हा संसार कसा आहे?
 
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तवा मियते भाकर!
 
सागरगोट्यांच्या वेलींना वरून काटेरी फुले आणि आत मात्र चिकने सागरगोटे असतात तसा हा संसार.
 
देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे
मधी चिक्ने सागरगोटे!
 
प्रतिकूल परिस्थितीत धीराने उभे राहून संकटाचा सामना करण्याचा सल्ला त्या देतात.
 
वार्‍याचं वाहादन, आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी, चुकू नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या, धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर, येवो संकट किती
 
तत्कालीन स्त्रीजीवनाचा आरसा म्हणून बहिणाबाईंनी रचलेल्या ‘माहेर’ आणि ‘माहेरची वाट’ या दोन कविता बघाव्या लागतात. बहिणाबाई आपल्या भावंडांच्या सहवासातले दिवस वर्णन करतात. रस्त्यातल्या ‘लौकी’ नदीचे वर्णन करतात. माहेरचे हे बहिणाबाईंचे प्रेम या ओळींनी तर बहरून गेल्यासारखे वाटते.
 
माहेरून ये निरोप
सांगे कानामंधी वारा
माझ्या माहेराच्या खेपा
‘लौकी’ नदीले इचारा!
 
माहेरी येण्याचा निरोप सांगणारा वारा, तोही कानात सांगतो आणि किती वेळा त्या माहेरी गेल्या, हे सांगणारी लौकी नदी. निसर्गाशी भावनिक नाते साघणार्‍या भूमिकेतून बहिणाबाई येथे जाणवतात.
मग ही माहेराची वाट कशी आहे? त्या वाटेवर त्यांना काय काय दिसते? नागवेलीचे मळे, त्यांचा मालक, त्याने कातरलेली पाने, वेचणारी मालकीण, मध्येच लागणारे आगगाडीच्या रुळांवरील फाटक; पण हे फाटक बहिणाबाईंना ‘आटक’ म्हणजे अडथळा करीत नाही, तर थांबवते.
माझ्या माहेराच्या वाटे
रेलवाईचे फाटूक
आगगाडीचं येनंजानं
तिले कशाची आटक?
 
रेल्वे येण्याच्या वेळेवर रुळावर लोकांनी जाऊ नये आणि आगगाडीला आटक करणे (अडवणे) शक्य नाही, म्हणून हे फाटक लावलेले.
 
माहेरच्या या वाटेने जाताना पायाला फोडही झाले तरी चालतच राहावे वाटते, अशी माहेरची ओढ. जर चालताना दगडाची ठेच लागली, तर दगडालाही वाचा फुटेल आणि तो प्रेमाने म्हणेल,
 
नीट जाय मायबाई
नको करू धडपड
तुझ्याच मी माहेरच्या
वाटंवरला दगड!
 
बहिणाबाईंना येताना पाहून जणू माहेरची साळुंकी भरार्‍या मारीत जाते आणि त्यांच्या आगमनाचा निरोप आईला देते.
 
ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोट्या
लेक बहिनाई आली
 
सर्वच सासुरवाशिणींच्या भावभावनांना वाचा फोडणारी ही कविता. दगडमाती, पशुपक्षी सगळ्यांशीच प्रेमाचे नाते जोडणार्‍या बहिणाबाईंच्या भावनिक नात्यांची उत्तुंग झेप इथे जाणवते.
 
‘कशाले काय म्हनू नही’ ही एक संस्कारक्षम कविता. नकारात्मक भाव दूर सारून सकारात्मक बाजू मनावर ठसविणारी जीवनद़ृष्टी देणारी कविता.
 
दुधावर आली बुरी, तिले साय म्हनू नही
जिची माया गेली सरी, तिले माय म्हनू नही
 
दुधावरची साय आणि बुरशी यातला फरक कळायला हवा. जिची मुलांप्रती माया संपली किंवा मुलांवर जी प्रेम करत नाही, ती माय ठरेल का?
 
बहिणाबाईंचे ‘घरोट्या’शी नाते अगदी जवळचे. अगदी समाधी अवस्थेप्रमाणे या जात्याची लयबद्ध घरघर ऐकताना अंतर्मुख होऊन त्या या घरोट्याशी, संसाराशी आणि देवाशी केव्हा हितगुज करू लागतात, ते कळतही नाही.
ज्याच्यातून पीठ ‘येते’, त्याला ‘जाते’ का म्हणावे? असा प्रश्न त्या करतात. या जात्याला दोन दाढा, दोन ओठ आहेत. मूठ-मूठ दाणे खाऊन त्याच्या ओठातून पीठ बाहेर पडते. मात्र, त्याला ज्वारीचाच घास मिळतो. सणासुदीला गव्हाचा घास, काही वेळा बाजरीचा घास.
 
अरे घरोटा घरोटा
घास माझा जवारीचा
तुले सनासुदी गहू
कधी देते बाजरीचा
 
पहाटे पहाटे घरागणिक जात्याची घर घर सुरू व्हायची. गावातल्या स्त्रिया दळू लागायच्या. त्याबरोबरच त्यांच्या मुखातून ओव्याही बाहेर पडायच्या. दळणाचे कष्ट जाणवू नयेत म्हणून त्या ओव्यांचे गायन. बहिणाबाईंच्या ओव्यांमध्ये तर विचारांची पेरणीच. घरोट्यालाच त्या म्हणतात,
अरे घरोटा घरोटा
माझे दुखता रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येते होटी
बहिणाबाईंच्या काव्यनिर्मितीचे रहस्य इथे उलगडते.
 
ग्रामीण भागातले स्त्री जीवन म्हणजे कष्टांचा डोंगर. जणूकाही 24 तास राबणारे यंत्र. सतत काम करणार्‍या या यंत्राला उसंत नसतेच. सणासुदीला कष्टातूनही जो आनंद मिळतो, तेच एक समाघान. एक सण ‘आखजी’. या अक्षयतृतीयेच्या सणाला मुलींना माहेरी जाण्याची संधी मिळते. लिंबाच्या झाडाला दोर बांधून झोपाळे तयार केले जातात. माहेरवाशिणी एकत्र येतात. कामातून तात्पुरती सुटका झाल्याचा आनंद मनवतात. गौराई मांडून सजवतात. झोके, फुगडी, झिम्मा, पिंगा असे खेळ खेळतात; पण हा
 
आनंद थोड्याच अवघीचा.
गेला झोका गेला झोका
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
 
माहेरात चार दिवस विसाव्याचे; पण या माहेरवाशिणी खेळत राहतात. पुढे मृग नक्षत्र लागले की पेरण्या सुरू होतात. म्हणून शेतीची मशागत करून ठेवावी लागते. शेतीचं काम ‘उद्या करू’ म्हणून चालत नाही. म्हणून आखजी सरताच मैत्रिणी निरोप घेताना म्हणतात,
 
सन सरे आस उरे
आखजी गेली व्हयी जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?
 
आता ही आखजी पुन्हा कधी येणार असा गहिवरल्या अंत:करणाने निरोप घेणार्‍या या सख्या बहिणाबाईंनी भावपूर्ण वर्णिल्या आहेत.
 
सासुरवासाचे वर्णन बहिणाबाईंच्या काव्यातही आहे. ‘सासुरवाशीण’ ही कविता तत्कालीन सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकते. मध्यरात्रीच कामाला सुरुवात करावी लागे. जात्यातून दळण दळणे, कोंबडे आरवताच पाणी आणण्यास जाणे, मग स्वयंपाक करणे, शेतीकामावर जाणे. बहिणाबाई येथे या सासुरवाशिणीला म्हणतात,
 
ऊठ सासुरवाशीन बाई
ऊठ जानं, शेतीकामाचा किती घोर
तू गोठ्यामघलं ढोर
 
असे ढोराप्रमाणे या सासुरवाशिणीला राबावे लागते. वरून सासू कातावलेली. तिची वटवट सुरूच; पण बहिणाबाई या सासुरवाशिणीला ‘पूस डोयामधले आसू’ असे सांगून त्या ‘घे सोशीसन घे, घालू नको वो वाद, कर माहेराची याद’ अशी माहेरच्या सुखाची आठवण करून देतात. तिच्या कष्टावर, त्रासावर मायेची हळुवार फुंकर घालतात.
 
‘पोळा’ हा शेतकरी जीवनातला महत्त्वाचा सण. बैलाचे कौतुक करण्याचा, त्याला विश्रांती देण्याचा हा दिवस. बैलांना अंघोळ घालून, शिंगे रंगवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. घरोघरी बैलांना जेवणाची आमंत्रणे असतात. बहिणाबाई मात्र एक मागणी करतात,
कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधता, बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालू बैलाले, माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास
 
आपल्या हौसेसाठी बैलांची स्पर्धा लावून, त्यांच्या शिंगाला ओझे बांधून त्यांना छळू नका. बहिणाबाईंची मुक्या जनावरांबद्दलची ही हळहळ मनाला चटका लावते. बैलांचे ॠण फेडण्याचा हा दिवस आहे, असे त्या सांगतात.
 
बहिणाबाईंच्या अशा कितीतरी कवितांतून, स्फुट ओव्यांतून तत्कालीन समाजजीवनातील चालीरीती, जीवनमान, मनोव्यापार या सगळ्यांचे दर्शन घडते.
 
बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेला वैचारिक अधिष्ठान आहे. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान ओळीओळीतून जाणवते. प्रत्येक कविता काहीतरी उपदेश देऊन जाते. जगण्यात आणि मरण्यात किती अंतर असते?
 
आला सास, गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं
एक सासाचं अंतर!
 
शेवटचा श्वास सोडला की खेळ संपतो. जगण्यात आणि मरण्यात केवळ एका श्वासाचे अंतर असते. अशा या क्षणभंगुर जीवनात माणसाने जगावे तर कसे?
जग जग माझ्या जीवा
असं जगनं तोलाचं
उच्च गगनासारखं
धरत्रीच्या रे मोलाचं
 
जीवनाबद्दल किती विशाल, किती व्यापक द़ृष्टिकोन आहे हा बहिणाबाईंचा? पण, आज माणूस ‘माणूसपण’ हरवून बसला आहे, जनावर झाला आहे. ‘मानूस’ कवितेत त्या म्हणतात,
मानसा मानसा
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं
गोठ्यातलं जनावर
 
गोठ्यातल्या गाईम्हशी चारा खाऊन दूध तरी देतात; पण माणूस खाऊनपिऊन बेइमान होतो. त्या दु:खी अंत:करणाने माणसाला विचारतात,
मानसा मानसा
कधी व्हशीन मानूस
लोभासाठी झाला
मानसाचा रे कानूस! 
 
अशा वेळी बहिणाबाईंना मानवी मनाचा शोध घ्यावासा वाटतो.
 
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर
 
मानवी मनाचे एक एक पैलू त्या सादर करतात. उभ्या पिकाकडे सतत धाव घेणार्‍या, हाकलूनही परत येणार्‍या वढाय (ओढाळ) ढोराप्रमाणे मन असते. त्याला एखाद्या गोष्टीची ओढ लागली की त्यापासून परावृत्त करणे कठीणच! याच मनाचे आणखी एक रूप त्या प्रकट करतात.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!’
 
विंचवाचे, सापाचे विष मंत्राद्वारे उतरवता येते; पण मनाच्या जहरीपणावर कोणताही मंत्र चालत नाही. एखाद्याविषयी कलुषित झालेले मन सहजासहजी निर्मळ होत नाही.
हेच मन खसखशीच्या दाण्याइतके छोटे असते तर कधी आभाळात न मावण्याइतके मोठे होते. ही मनाची संकुचित आणि उदात्त प्रवृत्ती बहिणाबाई वर्णन करतात.
 
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भूईवर
गेलं गेलं आभायात
 
पाखराप्रमाणे आकाशात भरारी मारणारे हे मन विजेप्रमाणे चपळ असते. असे हे मन या परमेश्वराने घडवले तरी कसे?
 
देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं!
 
मनाची ही जडणघडण परमेश्वराला जागेपणी पडलेले जणू स्वप्नच. परमेश्वराची ही किमया त्यांना विलक्षण वाटते. मनाचे स्वरूप बहिणाबाईंनी आणखी उलगडून दाखवले आहे, ते ‘हिरीताचं देनं घेनं’ या कवितेत-
 
नको लागू जीवा
सदा मतलबापाठी
हिरीताचं देनं घेनं
नही पोटासाठी’
 
माणसाने सतत स्वार्थी विचार करू नये. शेतातल्या पिकाचे उदाहरण देताना त्या म्हणतात,
 
उभे शेतामधी पिकं
ऊन वारा खात खात
तरसती कव्हा जाऊ
देवा, भुकेल्या पोटात
 
ऊन, वारा सहन करीत शेतात उभे पीक कोणाच्या तरी पोटात जाऊन त्याची भूक शमविण्यासाठी तरसत असते. त्याचप्रमाणे माणसानेही स्वार्थ सोडावा, असे बहिणाबाईंना वाटते; पण माणूस स्वार्थाचे खोटेनाटे व्यवहार सोडत नाही.
 
पाहीसनी रे लोकाचे
यवहार खोटेनाटे
तव्हा बोरी बाभयीच्या
आले आंगावर काटे
 
बोरीबाभळीच्या अंगावर आलेले काटे हे माणसांचे खोटेनाटे व्यवहार किंवा त्यांची भयानक कृत्ये पाहून आलेले आहेत. याच काट्यांचा उपयोग शेताभोवती कुंपण म्हणून होतो. काटेही परोपकारी होतात; पण माणूस स्वार्थ सोडत नाही.
जीवनाचे प्रत्येकच अंग बहिणाबाईंनी त्यांच्या रचनांमध्ये सुंदर रेखाटले आहे. त्यांच्या काव्याला नटण्यामुरडण्याची हौस नाही, अलंकारांची अपेक्षा नाही, बहिरंगांचा फाजील सोस नाही. ओघाने त्यांचे काव्य वाक्प्रचार, म्हणी आणि प्रतिमांनी नटते. निसर्गदत्त देणगीच्या जोरावर बहिणाबाईंच्या रचनांनी महाराष्ट्राला वेड लावले. त्यांना जाणवणार्‍या प्रत्येक संवेदनशील घटनेचा आणि घटकांचा त्यांनी वेध घेतला. या रचना बहिणाबाईंच्या निरीक्षणशक्तीचा परिचय देतात.
 
अभिजात काव्यनिर्मितीला साक्षरतेची उणीव भासते, हा भल्याभल्यांचा गैरसमज बहिणाबाईंच्या उत्स्फूर्त काव्यामुळे खोटा ठरला. हातात कधीही लेखणी न धरलेल्या बहिणाबाईंची अध्यात्म, निसर्ग, विनोद, कारुण्य, उपरोध, भक्ती, सामाजिक अशा विविध विषयांवरील कविता वाचताना मर्मज्ञ रसिकसुद्धा आश्चर्यचकित होतात. कुठेही अहंभाव नाही, स्पष्ट भूमिका मांडताना कुणाची भीडमूर्वत नाही. नैराश्याला दूर सारत आशेचा किरण तेवता ठेवत कठीण परिस्थितीशी लढण्याचा महामंत्र देणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त एकूणच व्यक्तिमत्त्वाला आणि कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन!
 
(लेखक इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ येथे प्राचार्य आहेत.)
9422867658