जम्मू – काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये आघाडी

22 Aug 2024 19:54:57
jammu and kashmir inc alliance


नवी दिल्ली :        जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा केली आहे.
 
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून निवडणुक एकत्र लढविणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बुधवारी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी भेट झाली. यानंतर आघाडीची घोषणा झाली.

फारुख अब्दुल्ला म्हणाले, सीपीआय(एम)चे नेतेही आमच्यासोबत आहेत. काश्मीरी मतदारही आमच्यासोबत असल्याचा विश्वास आहे. जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे ही काँग्रेस आणि इंडी आघाडीची प्राथमिकता आहे. आम्हाला आशा आहे की जम्मू आणि काश्मीरला सर्व अधिकारांसह पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल.

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्ष पीडीपीसोबत भविष्यात युती होण्याची शक्यता नाकारलेली नाही. निवडणुक झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो. नॅशनल कॉन्फरन्सने कोणासाठीही दरवाजे बंद केलेले नाहीत, असेही अब्दुल्ला यांनी नमूद केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0