'मंकीपॉक्स' संसर्गाबाबत पालिका सज्ज!

22 Aug 2024 18:43:04
bmc on Monkeypox

मुंबई :
पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्यसरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. यामुळेच महापालिका संचलित सेव्हन हिल्स रुग्णालयात १४ रुग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे. महापालिका क्षेत्रात 'मंकीपॉक्स' संसर्गाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाकडूनदेखील ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

या अनुषंगाने ‘मंकीपॉक्स’ संदर्भात दि. २१ ऑगस्ट रोजी विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO), इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय सभा झाली. विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO) विभागामार्फत ‘मंकीपॉक्स’ बाधित आफ्रिकन देशातून येणारे नागरिक तसेच इतर प्रवाश्यांची तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) येथे विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO) कार्यालयामार्फत आरोग्य माहिती कक्ष ( Health Information Desk ) उपलब्ध करण्यात आले आहेत.


मंकीपॉक्स संसर्ग आणि रुग्णांचा संसर्गजन्य कालावधी काय?
मंकीपॉक्स संसर्ग हा ऑर्थोपॉक्स (orthopox) या डीएनएच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे दोन्ही प्राणी विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रूग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकीपॉक्सचा प्रसार
 
- थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रव
- अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत
- बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

मंकीपॉक्स लक्षणे / चिन्हे
ताप,लसीका ग्रंथी सूज,डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला,कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

मंकीपॉक्स सदृश्य इतर आजार

कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलीस, हात, पाय, मौखिक आजार इत्यादी.

रूग्णव्यवस्थापन आणि विलगीकरण

- मंकीपॉक्स रूग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. याठिकाणी हवा खेळती असायला हवी.
- रूग्णाने तीन स्तर आधारीत मुखपट्टी (मास्क) घालणे गरजेचे आहे.
- रूग्णाने पुरळ फोड नीट झाकले जावे, यासाठी लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पँट वापराव्यात
- लक्षणानुसार उपचार घ्यावेत आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे प्रमाण कायम राहील, याची दक्षता घ्यावी.


Powered By Sangraha 9.0