विनापरवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड!

22 Aug 2024 18:10:15
bmc news on cutting down a tree

मुंबई :
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून झाडांची संख्या कमी झाल्याची तक्रार वारंवार पर्यावरणप्रेमींकडून केली जाते. त्यामुळे आता शहरातील झाड अनधिकृतपणे तोडल्यास ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका लवकरच या निर्णयाची अमंलबजावणी करणार आहे. रस्ता किंवा इमारतीच्या बांधकाम करण्यासाठी झाड तोडायचे असेल तरी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

यापुढे शहरातील कोणतेही धोकादायक झाड तोडण्याआधी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. समितीच्या परवानगी विना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. मुळात मुंबई शहरातील झाडांची संख्या वाढावी, यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या शासकीय, खासगी क्षेत्रातील संस्थांकडून मुंबई शहरात झाडांची लागवड केली जाते. त्यामुळे लावलेली झाडे टिकावीत, अनाधिकृतपणे झाडांची कत्तल रोखण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेकडे सोपवली आहे.

याआधी पालिकेकडे पर्यावरणप्रेमींकडून झाड तोडल्याच्या तक्रारी दाखल झाल्यास पाच ते दहा हजार रुपयांचा दंड आकरण्यात येत होता. पण आता पालिकेकडून दंडाची मोठी रक्कम आकारण्याचा नियम लागू केला जाणार आहे. त्यामुळे कोणतेही धोकादायक झाड तोडायचे असल्यास मुख्य उद्यान अधीक्षकांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर हा अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येतो.

Powered By Sangraha 9.0