नवी दिल्ली : बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने घेतली आहे. आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावून दोन आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १८ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या चार वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींचे शाळेतील कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या वृत्ताची ‘सुओ मोटो’ दखल घेतली आहे.
आयोगाने प्रसारमाध्यमांच्या अहवालातील मजकुराचे निरीक्षण केले आहे. त्यामध्ये तथ्य असल्यास मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यानुसार, त्यांनी मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून एफआयआर नोंदवण्यात विलंबाचे कारण, त्याची स्थिती आणि पीडित मुलींच्या आरोग्यासह या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.
आयोगाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की अधिकारी किंवा शाळा व्यवस्थापनाने पीडितांना कोणतेही समुपदेशन केले आहे का. अहवालात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी उचललेल्या अथवा प्रस्तावित केलेल्या पावलांचा देखील उल्लेख केला पाहिजे. दोन आठवड्यांत अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद अपेक्षित आहे.