कोलकाता अत्याचार प्रकरणावर पोस्ट केल्यावर अभिनेत्रीलाच आल्या बलात्काराच्या धमक्या

    21-Aug-2024
Total Views |
 
mimi
 
 
 
मुंबई : देशात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचा घटना समोर येत आहेत. सध्या कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू असून डॉक्टर्स, सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते आणि कलाकारांनीही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांना बलात्काराच्या धमक्या येत आहेत.
 
मिमी यांनी सोशल मिडियावर स्क्रीनशॉट शेअर करून लिहिलं, “आणि आम्ही महिलांसाठी न्याय मागतोय, हो ना? हे त्यापैकीच काही. महिलांच्या पाठीशी उभे आहोत असं सांगणाऱ्या गर्दीत मुखवटा घातलेल्या विषारी पुरुषांकडून बलात्काराच्या धमक्या सामान्य झाल्या आहेत. कोणते संस्कार आणि शिक्षण यास परवानगी देते?” असा सवाल मिमीने केला आहे. तिने या पोस्टमध्ये कोलकाता पोलिसांच्या सायबर सेल विभागाला टॅग केलं आहे.
 

mimi  
 
९ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून त्या डॉक्टर तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाबद्दल व्यक्त झाल्यामुळे आणि पोस्ट केल्याने बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचंही तिने सांगितलं. मिमी कोलकातामध्ये या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सहभागी झाली होती.