बदलापूरच्या घटनेमुळे राज ठाकरे पोलीसांवर संतापले! "हा कुठला..."

20 Aug 2024 15:46:37

Raj Thackeray
 
 
मुंबई : पोलीसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्र सैनिकांनाही या प्रकरणात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, "माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या!" दरम्यान घटनास्थळी जमलेल्या आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. आरोपीला फाशी द्या, इतकीच मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळावरुन बाजूला होण्यास नकार दिला आहे. पोलीसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, तरीही जमावाने पोलीसांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान संतप्त आंदोलकांनी शाळेचीही तोडफोड केली आहे. आरोपीला सनदशीर मार्गानेच ही लढाई लढावी लागेल, असे आवाहन पोलीसांनी केले आहे. घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन लवकरच दाखल होणार असून पोलीस अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.


Powered By Sangraha 9.0