बदलापूर स्थानकातून मोठी अपडेट! सात तासांनंतर सुरू होणार रेल्वे वाहतूक

20 Aug 2024 18:25:11
railway station badlapur protest
 

मुंबई :         तब्बल ७ तासांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेला बदलापूर स्थानकातील रेलरोको आंदोलन अखेर पोलिसांनी लाठीमार करून मोडीत काढले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला होता. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचे आश्वासनदेखील महाजनांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आता पोलिसांनी संतप्त जमावावर लाठीमार करत आंदोलनस्थळावरून जमाव हटविला आहे. गेल्या काही तासांपासून ठप्प असलेली रेल्वे वाहतूक सुरूळीत होण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनस्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना आदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली.

बदलापूरच्या एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एसआयटी' गठीत केली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष तपास पथक याप्रकरणाची चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंदर्भात प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले.

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर झालेल्या रेल रोको आंदोलनामुळे सकाळी दहा वाजल्यापासून ठप्प झालेली अंबरनाथ-कर्जत रेल्वेसेवा सायंकाळी पिकअवरपर्यंत विस्कळीत असल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. विशेषतः कार्यालयीन कामांसाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा यामुळे खोळंबा झाला. तर सकाळी मुंबईत कामावर पोहचलेल्या चाकरमान्यांनाही सायंकाळी घरी जाताना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दहा आरपीएफ अधिकारी आणि ६० जवान बदलापूर स्थानकावर तैनात करण्यात आले होते.



Powered By Sangraha 9.0