राहुल गांधी नागरिकत्व याचिका मानली जाणार ‘जनहित याचिका’
20 Aug 2024 17:52:54
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयीच्या याचिकेवर ‘जनहित याचिका’ म्हणून सुनावणी होईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयास निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका ही ‘जनहित याचिका’ मानली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी हे प्रकरण जनहित याचिकांशी निगडीत रोस्टर खंडपीठाकडे पाठवले आहे. त्याचवेळी याचिकेच्या गुणवत्तेविषयी न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणात सार्वजनिक हित गुंतलेले आहे आणि म्हणूनच, हे प्रकरण जनहित याचिकांशी संबंधित रोस्टर खंडपीठासमोर जनहित याचिका म्हणून सूचीबद्ध केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.