बदलापूर अत्याचार प्रकरण : आंदोलक आणि पोलीसांची झटापट! रेल्वे ट्रॅकवर दगडफेक
20 Aug 2024 13:42:54
ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्याला विरोध करताना आंदोलकांनी पोलीसांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी रेल्वे स्थानकांनी पोलीसांवर रोष व्यक्त केला आहे. आंदोलकांनी रुळावर ठिय्या सुरू केला आहे. दरम्यान, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या आदर्श शाळेच्या परिसरातून आंदोलकांना पांगवण्यात पोलीसांना यश आले आहे. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "आरोपीला आमच्या ताब्यात द्या!", अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे.
आधी फाशी द्या!, मग आम्ही ट्रॅक मोकळा करतो, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. इथे कुणीही लोकप्रतिनिधी नको आम्हाला न्याय द्या, असेही आंदोलक पालकांनी म्हटले आहे. दरम्यान, शाळेच्या आवाराबाहेर जमलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट उखडून टाकला. त्यानंतर शाळेतील वस्तूंची तोडफोड करण्यात आली.
पोलीसांनी अश्रूधुरांचा वापर केला मात्र, आंदोलकांनी अश्रूधुराची नळकांडी पोलीसांवरच भिरकावली. तीन महिन्यांत तपास पूर्ण करू, या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्डात महिला न्यायाधीशांसमोरच करू, असे आश्वासन आंदोलक समितीला देण्यात आले मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी आरोपीला थेट फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.