“मी जिवंत आहे”; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयसने सुनावलं

20 Aug 2024 14:27:16
 
shreyas talapde
 
 
 
मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे याला गेल्या वर्षी ह्रदयविकाराचा झटका झाला होता. त्यातून तो सुखरुप बरा होऊन पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला होता. पण आता चक्क सोशल मिडियावर श्रेयस तळपदेच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे अभिनेता चांगलाच संतापला असून त्याने अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
 
श्रेयस तळपदेने पोस्ट करत लिहिलं आहे की, “मी जिवंत आहे, आनंदी आहे व निरोगी आहे हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरू झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजीचं निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरून माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे.”
 
पुढे तो लिहितो की, “माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढतेय. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. अशा पोस्ट करणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांनी हे थांबवावं आणि या पोस्टच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे. लोकांच्या भावना दुखावण्यासाठी विनोदाचा वापर केला जातोय हे पाहून वाईट वाटतंय. कारण या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि आमच्या आयुष्यात व्यत्यय आणतात. जेव्हा तुम्ही अशा अफवा पसरवता तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही, तिच्या कुटुंबावरही परिणाम होतो. खासकरून लहान मुलं जे या गोष्टी समजू शकत नाही,” असं श्रेयसने म्हटलं आहे.
 

shreyas talapade  
 
“ज्यांनी माझी विचारपूस केली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आही. ट्रोल्सना, माझी एकच विनंती आहे की कृपया हे सगळं थांबवा. दुसऱ्यांवर असे विनोद करू नका. तुमच्याबरोबरही असं काही घडावं असं मला कधीच वाटणार नाही, त्यामुळे थोडे संवेदनशील व्हा,” असं श्रेयस तळपदे त्याच्या पोस्टमध्ये लिहिले असून आता तरी ट्रोल करणाऱ्यांना लोकांच्या भावना कळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0