संस्थेतर्फे अभिनंदनाचा वर्षाव ; जुन्या आठवणींना उजाळा
02-Aug-2024
Total Views |
नाशिक : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकविणारा स्वप्नील कुसळे हा ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’च्या भोंसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजचा रामदंडी आहे. भारतासाठी पदक मिळवून देणार्या स्वप्नीलच्या या यशाने भोंसलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून भोंसला आणि पदकविजेत्या खेळाडूंची यशस्वी परपंरा दर्शवणारे हे नाते कायम असल्याचे दिसून येते.
या यशामुळे संस्था आणि संपूर्ण कॅम्पसच्यावतीने स्वप्नीलचे अभिनंदन केले जात आहे. यानिमित्ताने पदाधिकारी, क्रीडाशिक्षकांनी जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. स्वप्नीलने भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये असणार्या नेमबाजीच्या क्रीडा प्रबोधिनीद्वारे तत्कालीन राज्य प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांच्याकडे आपल्या खेळाला सुरुवात केली. इयत्ता नववी, दहावीचे (सन 2009 ते 2011) त्याचे शिक्षण हे स्कूलमध्ये झाले.
त्यानंतर पुढे इयत्ता 11वी ते पदवीचे प्रथम वर्ष वाणिज्य शाखेचे (सन 2011 ते 2014) शिक्षण हे त्याने भोंसला मिलिटरी कॉलेजमधून घेतले. आपल्या या शैक्षणिक काळात त्याने नेमबाजीचा खेळ सुरूच ठेवला. संस्थेच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचादेखील त्याला फायदा झाला.
नियमित सराव व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे त्याला हे ऐतिहासिक असे यश संपादन करता आले. ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’चे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य आदी पदाधिकार्यांनी स्वप्नीलच्या या यशाबद्दल अभिनंदन करत आनंद भावना व्यक्त केली.
भोंसला कॅम्पस खेळाडूंची खाण
“नियमित सराव, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शनामुळेच स्वप्नील कुसळे याला हे यश संपादन करता आले. तो आमच्या संस्थेचा रामदंडी असल्याने तसेच त्याने भारतासाठी पदकाची कमाई करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. भोंसला कॅम्पस ही खेळाडूंची खाण असून त्याचे हे यश आमच्या इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल,” अशी भावना संस्थेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
भोंसलाने देशाला दिले नामांकित खेळाडू
सैनिकी शिक्षणासाठी देशात परिचित असलेली ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचलित भोंसला मिलिटरी स्कूल, कॉलेज हे दर्जेदार, नावाजलेले खेळाडू घडविणारी संस्था म्हणून परिचित आहे. यापूर्वीच्या शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी आणि कॅम्पसच्या ‘खेलो इंडिया’द्वारे अनेक नामांकित खेळाडू संस्थेने देशाला दिले आहेत. त्यात अर्जुन पुरस्कारविजेती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव, किसन तडवी, ताई बामणे, मोनिका आथरे, कोमल जगदाळे यांसारख्या धावपटूंचा उल्लेख करता येईल.