बोगस आधारकार्ड दाखवून भारतात घुसत होते चीनी नागरिक; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

02 Aug 2024 15:42:22
 
Fake Aadhar Card
 
 
(Photo Credit : Dainik Jagran)
 
शिमला : बनावट आधारकार्डद्वारे (Fake Aadharcard) घुसखोरी करणाऱ्या दोन चीनी नागरिकांना भारत-नेपाळच्या सोनौली सीमेवर बुधवार, दि. ३१ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत तिबेट वंशाची काही निर्वासितही सापडले होते. भारतात घुसण्यासाठी त्यांनी बनावट आधारकार्ड तयार केले होते. यासाठी दिल्लीत स्थित असलेल्या काही तिबेटी वंशाच्या भारतीय नागरिकांनी त्यांना मदत केली, अशी माहिती आहे.
 
बोगस आधारकार्ड (Fake Aadharcard) तयार करताना त्यांनी आपल्या आधारकार्डवर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या जिल्ह्यांतील शहरांच्या नावांचा वापर पत्त्यांसाठी केला. मात्र, ते भारतात येत असताना सीमेवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडलं. भारतात येण्यासाठी खोटे आधारकार्ड बनवण्यात आले, असे पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी पकडल्यानंतर ते स्वत: मुकबधीर असल्याचे नाटक करत होते. मात्र, ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांची कडक चौकशी केली. त्यावेळी त्यांचा हा बनाव उघडकीस आला. औषधांचा व्यवसाय करत असल्याने वनौषधांसाठी भारतात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा पासपोर्ट तपासल्यावर ते चिनी नागरिक असल्याची माहिती उघड झाली.
 
यात एकाचे नाव हे ज्यू वाक्यांग तर दुसऱ्याचं नाव हे यांग मेंगमेंग आहे. तर आधारकार्डावर विजेन दोराजी आणि ज्यू वाक्यांग, अशी नावे होती. या सर्व खटाटोपासाठी तिबेटी वंशाच्या भारतीय नागरिकाने चिनी नागरिकांकडून ४० हजार रूपये घेतले. चौकशीदरम्यान भारतात स्थित असलेल्या तिबेटी नागरिकांची चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी तो म्हणाला की, मूळचा तिबेटी नागरिक असून दिल्लीच्या कृष्णनगरमध्ये राहतो, असे चौकशीदरम्यान माहिती समोर आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0