मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांची प्रमूख भूमिका असणारा मैने प्यार किया हा चित्रपट ३५ वर्षांनीही प्रेक्षकांना पाहावासा वाटतो. राजश्री या निर्मितीसंस्थेचा हा चित्रपट आजही टीव्हीवर दाखवला जातो. पण आता तब्बल ३५ वर्षांनंतर प्रेक्षकांना हा चित्रपट थेट चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
सूरज बडजात्या यांचा 'मैने प्यार किया' हा ८० च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सलमान खानने प्रेम नावाची भूमिका साकारली होती. तर भाग्यश्रीने सुमनची व्यक्तीरेखा साकारली होती.
सुमन ही साधी होती. सुमन आणि प्रेमचे वडील बालपणीचे मित्र होते, पण त्यांच्यात श्रीमंती आणि गरिबीची उंच भिंत होती. या भिंतीमुळे प्रेमच्या वडिलांनी सुमनला आपली सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता असे चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू, आलोक नाथ, मोहनीश बहल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्त्वाची घोषणा करत 'मैने प्यार किया' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करत असल्याची घोषणा केली आहे. राजश्री फिल्मसने आपल्या अधिकृत इ्न्स्टाग्राम अकाउंटवर माहिती देत 'मैने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करणार असल्याची माहिती दिली आहे. चित्रपटप्रेमींच्या मनात स्थान मिळवणाऱ्या प्रेम आणि सुमनची प्रेम कहाणी २३ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट पीव्हीआर आणि सिनेपॉलिसमध्ये प्रदर्शित होणार असूनहा चित्रपट पुन्हा येणार याबद्दल भाग्यश्रीनेदेखील आनंद व्यक्त केला आहे.