देशात 'फॉक्सकॉन'चा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्लांट उभारणार; येत्या वर्षात गुंतवणुकीत आणखी वाढ

18 Aug 2024 17:14:39
foxconn battery energy storage system
 
 
नवी दिल्ली :          तैवानची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी फॉक्सकॉन भारतात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्लांट उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. फॉक्सकॉन इलेक्ट्रिक वाहन(ईव्ही) विभागावर लक्ष केंद्रित करून बॅटरी उत्पादन व्यवसायाचा विस्तार करत आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी दिली आहे.
 
दरम्यान, ईव्ही वाहनांना दिले जाणारे प्रोत्साहन लक्षात घेता कंपन्यांकडून उत्पादनावर अधिक भर दिला जात आहे. फॉक्सकॉन कंपनीकडून ईव्हीचा पहिला प्लांट तैवानमध्ये स्थापन करण्यात आला असून भारतात बॅटरी उत्पादन व्यवसाय विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. लिऊ म्हणाले की, फॉक्सकॉनचा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान विभाग नुकताच भारतात सुरू झाला आहे. कंपनी भारतात स्वतःचे भविष्यातील उद्योग स्थापन करण्यास उत्सुक आहे, असे लिऊ म्हणाले.
 
विशेष म्हणजे कंपनीकडून तामिळनाडू येथे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमकरिता सहकार्य मिळविण्यासाठी येथील उद्योगमंत्र्यांशी संवाद सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. फॉक्सकॉनने 3+3 धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहने, डिजिटल आरोग्य आणि रोबोटिक्स उद्योग या तीन प्रमुख उद्योगांना प्राधान्य दिले आहे. तसेच, कंपनीचा सीएजीआर २० टक्क्यांसह लक्षणीय वाढीची क्षमता ठेवतो, असेही कंपनीचे म्हणणे आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0