दर्यावरी आमची डोले होरी...

17 Aug 2024 21:08:06
narali paurnima cinema songs


उद्या, सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा. या दिवशी खवळलेल्या समुद्राची मनोभावे पूजा करुन, नारळ अर्पण करुन, कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पावसाळ्यात खंड पडलेल्या मासेमारीला पुन्हा प्रारंभ होतो. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव नृत्य आणि गीतांसह मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. त्यानिमित्ताने अशाच काही कोळी लोकगीतांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे विविध पदर उलगडणारा हा लेख...


सन आयलाय गो आयलाय गो
नारळी पुनवेचा
मनी आनंद मावना कोळीयेचा दुनियेचा
दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या ओळी आपल्या कानांवर पडतात. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण किती महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो, हे या ओळींमधून प्रतीत येते. समुद्रात जाऊन मासेमारी करणे हा कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय. वर्षभर मासेमारी करून कोळीबांधव आपला उदरनिर्वाह करतात, पण पावसाळ्यात हाच समुद्र रौद्ररूप धारण करतो. या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्याच्याकडे प्रार्थना केली जाते. समुद्राला कोळी लोक प्रेमाने ‘दर्या’ म्हणतात. हा ‘दर्या’ त्यांच्या जगण्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्यांची बरीचशी लोकगीते या दर्यावरच रचली गेलेली आहेत.

दर्याच्या सान्निध्यात राहणार्‍या कोळी बांधवांचे मनदेखील दर्यासारखेच विशाल. दर्या जसा सतत ओसंडून वाहत असतो, तसा या कोळी बांधवांच्या आयुष्यात उत्साह ओसंडून वाहत असतो. समुद्रात होडी नेऊन मासेमारी करण्याचे जीवावर बेतू शकणारे कामसुद्धा हे कोळी बांधव अगदी आनंदाने गाणी म्हणत म्हणत करतात. समुद्रात होडी घेऊन गेलेल्या एका कोळी नाखवाच्या मनात काय भावना असतात, याचे वर्णन गीतकार बुधाजी कोळी यांनी ‘आम्ही हाव जातीचे कोली’ या गीतात केले आहे. या गीतातील नाखवा म्हणतो-

दर्यावरी आमची डोले होरी
घेऊन माशांच्या ढोलीन्
आम्ही हाव जातीचे कोली
दर्या आपला राजा आहे. नारळी पौर्णिमेला त्याला नारळ दिलेला आहे. त्यामुळे तो आपले रक्षण करेल, आपल्या जीवाला समुद्रात काहीही धोका नाही, असा विश्वास त्या नाखवाला असतो. म्हणून या गाण्यातील नाखवा पुढे म्हणतो-


दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जिवावर आम्ही करताव मजा
नारलपुनवेला नारल सोन्याचा
सगळे मिळून मां देताव दरियाचा
दर्याला राजा मानणारा कोळी नाखवा कधीकधी अभिमानाने स्वत:लाच या ‘दर्याचा राजा’ म्हणवून घेतो. ‘मी सहज बंदरातून दर्यात ये जा करतो, म्हणून मी दर्याचा राजा आहे’ असा भाव कोळी कधी कधी नाखवाच्या मनात येतो. त्याचा मनातील हाच भाव व्यक्त करणारे ‘मी डोलकर डोलकर’ हे गीत शांता शेळके यांनी लिहिले आहे.

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा
स्वत:ला ‘दर्याचा राजा’ म्हणवून घेताना या नाखवाच्या मनात जराही अहंकार नसतो. त्याच्या मनात असते ते केवळ समुद्राविषयी अपार प्रेम आणि हा समुद्र आपला आहे, याचा सार्थ अभिमान. मासे या समुद्राची संपत्ती आहेत आणि त्या संपत्तीवरच आपला उदरनिर्वाह होतो, याची प्रत्येक कोळ्याला जाणीव असते. म्हणूनच या गीतात शांताबाईंनी पुढे लिहिले आहे-

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
मासेमारी हा जिकिरीचा व्यवसाय असतो. या व्यवसायात कधी कधी समोर काळ उभा राहतो. त्या काळाशीही झुंज देण्याची ताकद कोळी बांधवांमध्ये असते, कारण, त्याचा त्याच्या दर्याराजावर आणि स्वत:वर पूर्ण विश्वास असतो. कोळ्यांच्या या झुंजारवृत्तींचे वर्णन करणारे ‘सुटला वादळी वारा’ गीत शाहीर अमरशेख यांनी लिहिले आहे. या गीतातील मासेमारी करायला गेलेल्या कोळ्यांच्या समोर जेव्हा संकट येते तेव्हा एकमेकांना धीर देताना ते म्हणतात-

किनारा गाठूं तर खाईल ना पोरं - धीरानं घ्या रं
दर्यात हिमतीनं डोली टाका रं - म्हावरा धरा रं
म्हावर्‍यासाठी नाव लोटलिया ना रं? - काळाच्या म्होरं
पोटासाठी नाव लोटलिया ना रं? - काळाच्या म्होरं
काळावरी वार करा अन् भरभर म्हावरंबी धरा
झुंजुं गाठूं किनारा, गड्या गाठूं किनारा रे
समोर आलेले संकट जेव्हा अधिक भयावह होते, वादळाचा वेग जेव्हा अधिक वाढतो, तेव्हा ही होडी घेऊन गेलेले कोळीबांधव खचून जात नाही, उलट ते एकमेकांना अधिक धीर देतात आणि धैर्याने त्या वादळाला सामोरे जातात. ‘नाचे दर्यात तारू’ या गीतात समोर आलेल्या वादळाला तोंड देताना कोळी एकमेकांना म्हणतात-


तुफानी सुटलंय वारा रं, चारी बाजुंनी तरारं
त्यांनं टाकलाय होडीला घेरा
इथं कसलेला नावाडी सारा
एका दमात गाठू किनारा
आज जिवाचं भान आम्हा नुरलंय रं
नाचे दर्यात तारू थय थय थय
चारी बाजूला तुफान भरलंय
एकीकडे होडी घेऊन समुद्रात गेलेला कोळी नाखवा वादळाला तोंड देत असतो. वादळाशी तो जरी खंबीरपणे लढत असला, तरी घरी असलेल्या त्याच्या पत्नीचा मात्र धीर खचलेला असतो. समुद्राला आलेलं उधाण पाहून ती घाबरलेली असते. आपला नवरा सुखरूप घरी परत यावा, यासाठी ती धडपडत असते. अशा प्रसंगात ती आकाशातल्या चंद्राला साद घालते. या चंद्राला तिने आपला भाऊ मानलेला असतो. या भावाला ती नवर्‍याचे रक्षण करण्याची विनंती करते. समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या प्रत्येक नाखवाच्या बायकोच्या मनातील हे भाव ‘दर्या राजाला आज उधाण आयलंय’ या लोकगीतात अचूकपणे मांडले आहे. या गाण्यातील नाखवाची पत्नी म्हणते-

दर्या राजाला आज उधाण आयलंय
धनी गेले दर्यावर
चांद राजा तु रं, भावा माझ्या तु रं
ध्यान ठेव धन्यावर
हे गीत जरी लोकगीत असले, नाखवाच्या बायकोने बहिणीच्या नात्याने त्या चंद्राकडे विनंती केलेली असली, तरीही वैज्ञानिकदृष्ट्या चंद्राचा समुद्राला आलेल्या भरतीशी संबंध असतो आणि तोही कुठेना कुठे या गीतामधून स्पष्ट होतो.

समुद्रात उसळलेले वादळ पाहून जरी नाखवाच्या बायकोला भीती वाटत असली, तरी या वादळातही आपला नाखवा होडी घेऊन समुद्रात गेला, तो इतका शूर आहे, याचा तिला सार्थ अभिमान वाटत असतो. तिच्या मनातील पतीविषयीचा हा अभिमान ‘वादलवारं सुटला गो’ या गीतातून व्यक्त होतो.

वादलवारं सुटलं गो
वार्‍यानं तुफान उठलं गो
भिरभिर वार्‍यात
पावसाच्या मार्‍यात
सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं गो
अशा या वादळवार्‍यात नाखवाने जाळे फेकून भरपूर मासे कसे पकडल्याचे अभिमानाने वर्णन करताना ती पुढे म्हणते-

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसची माळ
कमरेत जरा वाकुनिया
पान्यामंदी जालं फेकुनिया
नाखवा माजा
दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यात लुटलं
वादलवारं सुटलं गो
असा हा दर्या, हा कोळी बांधवांसाठी फक्त व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. त्यांच्यासाठी प्रेमाचे प्रतीकही हा दर्याच. म्हणून अनेकदा कोळी समाजातील प्रियकर, प्रेयसी एकमेकांचा उल्लेख करताना दर्याचं वर्णन करतात. ‘अगं पोरी संबाल दर्याला’ या गीतातील प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो-


अगं पोरी संबाल दर्याला तूफान आयलंय भारी
लाट पिरतीची भन्नाट होऊन आभाली घेई भरारी
तर ‘तू दर्याचा राजा नाखवा’ या गितातील प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते-
जवा दर्याची रुपेरी मासळी
तुझ्या डोळ्यांत मजला भासली
तुझी पिरती मनामधी हसली
चल माघारी ये रे नाखवा रे नाखवा
दर्याच्या लाटांवर
खरोखरचं कोळी बांधव आणि समुद्र यांना वेगळे करणे शक्य नाही, हे या गीतांमधून स्पष्ट होते. समुद्र हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण, कोळी समाजासाठी तो जिव्हाळ्यासोबतच जगण्याचाही विषयही असतो. हा दर्या त्यांची ओळख आहे. आपण जसे देवाचे आभार मानण्यासाठी नारळ वाहतो, तसेच कोळीबांधव या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या या दर्यादेवाला नारळ वाहतात. याच दर्यावर रचलेल्या अनेक कोळीगीतांच्या तालावर ते आपले पारंपरिक नृत्याचा ठेका धरतात. समुद्र, कोळी बांधव आणि त्यांची दर्यावर रचलेली कोळीगीते हा काही एका लेखात किंवा काही शब्दांत सामावणारा विषय नाही, पण नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काही प्रमुख गीतांचे केलेले हे रसग्रहण...

दिपाली कानसे
 
Powered By Sangraha 9.0