मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवरही कल्ला केला होता. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी थेट टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिस गाजवलं. यानंतर ओटीटीवर चित्रपट कधी येईल याची प्रेक्षक वाट पाहात असताना आता टीव्हीवर येत आहे. ‘मुंज्या’ हा चित्रपट शनिवारी २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्ड चॅनलवर पाहता येणार आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. ३० कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात ११८ कोटींची कमाई केली, तर जगभरात १२३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे यांनी महत्वपुर्ण भूमिका साकारली आहे.