मुंबई : आमच्या भावांना बहिणीचं नातं कळलंच नाही, याचं दुर्दैव आहे, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. मुंबईतील षणमुखानंत सभागृहात शुक्रवारी महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं चूक होतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी बहिण भावाच्या नात्यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, "लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहिण आठवली नाही. निकालानंतरच बहिणी आठवायला लागल्या. बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही, या गोष्टीचं दुर्दैव आहे. त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम करायला गेलात तर घाटे का धंदा होईल आणि प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे की, त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही."
हे वाचलंत का? - नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदावरून भर सभेत ठाकरेंचे टोचले कान! म्हणाले, "CM चेहरा हा..."
"एक बहिण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू, असं ते म्हणतात. पण १५०० रुपयाला या राज्यातील नातं विकाऊ नाही. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. बहिण भावाच्या निरागस प्रेमाची किंमत लावायचं पाप महाराष्ट्राच्या सरकारने केलं आहे," अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.