मुंबई : राज्यभरात सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतून एक मोठी बातमी पुढे आली आहे. काँग्रेस विदर्भात ४० पेक्षा जास्त जागांवर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकाही महाविकास आघाडी विरुद्ध महायूती अशा होणार आहेत. दरम्यान, दोन्ही यूती आणि आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झालेलं नाही.
अशातच आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विदर्भात ४० जागा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विदर्भात ६२ पैकी ४० पेक्षा जास्त जागांवर दावा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतू, उबाठा आणि शरद पवार गटाला हे मान्य आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संभ्रम आहे. संजय राऊतांकडून वारंवार उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार, असे वक्तव्य करण्यात आले आहे. तर ज्याच्या जास्त जागा निवडून येणार त्याचा मुख्यमंत्री, अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाने घेतली आहे. या सगळ्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे.