नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने इंधनदरात मोठी कपात करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या किमतीत ८.४७ रुपयांनी तर हाय स्पीड डिझेलच्या(एचएसडी) किमतीत ६.७ रुपयांनी कपात करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही दर कपात पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी करण्यात आली असून येथील जनतेसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये आता पेट्रोलचा दर २६०.९६ रुपये प्रति लीटर आणि हायस्पीड डिझेलचा दर २६६.०७ रुपये प्रति लीटर झाला आहे. पाकिस्तानच्या उर्दू वृत्तवाहिनी पीटीव्ही न्यूजने या दरकपातीचे वर्णन स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांना दिलेली मोठी भेट असे केले आहे. पेट्रोलची किंमत प्रति बॅरल ८४ डॉलर आणि हायस्पीड डिझेलची किंमत प्रति बॅरल ९१ डॉलरवर आली आहे.
पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?
पाकिस्तानी माध्यमाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेल (एचएसडी) च्या किमती प्रति लिटर ९.२ रुपयांनी कमी होण्याची शक्यता होती. गेल्या पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने इंधनाचे दर घसरले आहेत.
पेट्रोलची किंमत प्रति बॅरल ८४ डॉलर आणि हायस्पीड डिझेलची किंमत प्रति बॅरल ९१ डॉलरवर आली आहे. पाकिस्तान सरकार पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलवर सुमारे ७८ रुपये प्रति लीटर कर आकारत आहे, ज्यामध्ये ६० रुपये प्रति लीटर पेट्रोलियम विकास शुल्क तर सुमारे १८ रुपये प्रति लीटर सीमा शुल्क अंतर्भूत आहे.