साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब. त्यामुळे कोणत्याही काळाचा जर अभ्यास करायचा असेल, तर त्या त्या काळात निर्माण झालेल्या साहित्याचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. आपल्या देशातही स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळातही समाजमनाची अवस्था काय होती, हे त्या त्या काळात लिहिल्या गेलेल्या काव्य, कादंबरी, नाटके आणि अन्य साहित्यप्रकारांवर नजर टाकली असता लक्षात येते. या साहित्याने केवळ स्वातंत्र्यलढ्याचे शब्दचित्रच रेखाटण्याचे काम केले नाही, तर त्याच शब्दांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात राष्ट्रभक्ती आणि गुलामगिरीविरोधात चीड निर्माण केली. वेळप्रसंगी ब्रिटिश सत्ताधीशांवर शाब्दिक आसूडही उगारले. तेव्हा, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारे साहित्यिक आणि त्यांच्याच काही साहित्यकृतींचा लेखातून घेतलेला हा आढावा...
स्वातंत्र्यकाळातील काव्याचा विचार करताना एक नाव सर्वप्रथम घ्यावे लागते, ते म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’. सावरकरांनी त्या काळात लिहिलेल्या रचना आजही आपण वाचल्या, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या भावनेने त्यांचे काव्य किती ओतप्रोत भरलेले होते, हे लक्षात येते. देवभक्तीवर आधारित कविता ज्या तन्मयतेने लिहिल्या जातात, त्याच तन्मयतेने सावरकरांनी देशभक्तीवरच्या कविता लिहिल्या. त्यांची ‘ने मजसी ने परत मायभूमीला’, ‘जयोस्तुते’ ही प्रसिद्ध काव्ये आपल्या परिचयाची आहेतच, पण या व्यतिरिक्तही सावरकरांनी देशभक्तीपर आधारित स्फूर्तीदायी काव्यांची रचना केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर आपल्या काव्यातून स्वातंत्र्याची बीजे रोवलीच, पण त्यांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरविलेे, त्या गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणजेच कवी गोविंद यांनीही ‘रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले’ अशी अजरामर काव्यरचना केली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येकाने प्राणपणाने झोकून सहभागी होणे गरजेचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला या काव्यशस्त्रांनी करून दिली. अनेक पोवाड्यांची रचना करून कवी गोविंद यांनी भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्य मिळवण्याची आग धगधगती ठेवली. ‘बलसागर भारत होवो’ असे म्हणणार्या साने गुरुजींच्याही अनेक कविता स्वातंत्र्यप्राप्तीच्या भावनेने प्रेरित झालेल्या होत्या. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजे जेव्हा ‘पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे आमचे ध्येय आहे’ अशी घोषणा झाली, त्यावेळीच भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार, या आनंदात साने गुरुजींनी ‘मंगल मंगल त्रिवार मंगल’ ही कविता लिहिली. त्यांच्या ‘उठवू सारे रान’ या कवितेत शेतकरीसुद्धा हातात तिरंगा घेऊन लढण्यासाठी सज्ज आहेत, भारतावर आता वाईट नजर टाकणार्यांविरोधात आम्ही एकजुटीने लढण्यास सज्ज आहोत, असा इशारा त्यांनी शत्रूला दिला होता.
महाराष्ट्राचे एक लाडके कवी म्हणून ओळखल्या जाणार्या ग. दि. माडगूळकरांनीही स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. ‘झडल्या भेरी झडतो डंका’ या कवितेतून त्यांनी आता ‘युद्धाला तोंड फुटले आहे. काहीही झाले तरी मागे वळू नका, आपल्याला विजयाच्या हाका ऐकायच्या आहेत’ असे आवाहन भारतीयांना केले होते. ‘वेदमंत्रांहून आम्हां वंद्य वंदे मातरम्’ या कवितेतून ‘देवभक्तीइतकीच आम्हाला देशभक्ती महत्त्वाची आहे,’ ही भारतीयांच्या मनातील भावना अत्यंत समर्पक शब्दांत मांडली होती. ‘क्रांतिकवी’ म्हणून ओळखल्या जाणार्या विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या कवितांनीही या काळात मोठी क्रांती केली. ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितेतून कुसुमाग्रजांनी आपले सारे आयुष्य स्वातंत्र्यलढ्यात समर्पित करून हौतात्म्य पत्करणार्या क्रांतिकारकांची तरुणांना आठवण करून देऊन त्यांना क्रांतीचे महत्त्व समजावून सांगितले. भारतमातेच्या पुत्रांना एल्गारित करण्यासाठी कुसुमाग्रजांनी ‘हा काठोकाठ भरा’ ही कविता लिहिली. ‘अजिंक्य निर्धार’ ‘आगगाडी व जमीन’, ‘बलिदान’ यांसारख्या अनेक कविता लिहून कुसुमाग्रजांनी भारतीयांना क्रांतिपर्वात सहभागी होण्याचे आणि ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी प्रेरित केले.
‘अजिंक्य निर्धार’मध्ये कुसुमाग्रज म्हणतात की,
न पराजयाने पराभूत होतसे
हा मृत्युंजय, ना मरणाने मरतसे
विजयाची एकच अखेर त्याला असे
स्वातंत्र्याचा ध्वज या गगनी गर्वाने चढणार
आहे अजिंक्य हा निर्धार
तर ‘बलिदान’मध्ये कुसुमाग्रज म्हणतात की,
चितेवरी वीरांनो अपुली
जरी शरीरे भस्म जाहली
झळकत येईल या अग्नितुन समराचेच निशाण!
हे व्यर्थ न हो बलिदान!
काव्याप्रमाणेच स्वातंत्र्यचळवळीला प्रेरणा देणार्या अनेक कादंबर्याही स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिल्या गेल्या. या कादंबर्यांमध्ये श्रीधर व्यंकटेश केतकर यांची ‘नि:शस्त्राचे राजकारण’, वि. वा. हडप यांच्या ‘अन्नदाता उपाशी’, ‘गोदाराणी’, ‘वादळ’, व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘कोवळे दिवस’, ‘स्वातंत्र्यचळवळ व वावटळ’, अ. ब. कोल्हटकरांची ‘इंग्रजांचा पराभव’, धो. मु. देशपांडे यांच्या ‘बंडाचे निशाण’, ‘स्वातंत्र्याच्या रणांगणात’, शिवराम यांची ‘विषप्रयोग’, सी. शि. लाटलीकरांची ‘दडपशाही’, दा. ना. शिखरे यांची ‘थोरली आई’ यांसारख्या अनेक कादंबर्यांचा समावेश होता. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा विस्तृत वाङ्मयप्रकार म्हणून ‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराला ओळखले जाते. या काळात लिहिल्या गेलेल्या कादंबर्यांनी फक्त वाचकांना खिळवूनच ठेवले नाही, तर ब्रिटिश राजवटीतील जुलमी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडून त्यांना स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यासाठी चालना दिली. रंजन करता करता लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कामही या कादंबर्यांनी केले.
काव्य आणि कादंबर्यांप्रमाणेच मराठी नाटकांचेही स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तितकेच मोलाचे. कथा आणि कादंबर्यांच्या तुलनेत नाटक हा प्रकार सादर करणे फार जिकिरीचे काम होते. कारण, बरेचदा ती नाटके सादर होत असताना ब्रिटिश अधिकारी समोर बसलेले असत आणि त्यांना काही आक्षेपार्ह आढळले तर नाटककाराला कडक शिक्षा सुनावली जात असे. अशा परिस्थितीतही ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरोधात लोकांच्या मनात चीड निर्माण करणारी अनेक धाडसी नाटके त्या काळात लिहिली गेली आणि ती सादरही झाली. या नाटकांमधली वाक्यरचना इतक्या चातुर्याने केली गेलेली असे की, ते नाटक पाहणार्या ब्रिटिश अधिकार्यांना ते त्यांच्याविरोधात लिहिलयं हे बरेचदा लक्षातही येत नसे.
शंकर मोरो रानडे यांनी लिहिलेले ‘अधिकारदान विवेचना’, अनंत हरी गद्रे यांचे ‘संगीत स्वराज्यसुंदरी’, मामा वरेरकर यांचे ‘सत्तेचे गुलाम’, गोपाळ गोविंद सोमण यांचे ‘राजकोपहर’, ‘बंधविमोचन’ यांसारख्या अनेक नाटकांनी स्वातंत्र्याचा हुंकार केला. ‘नाट्याचार्य’ म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांनी अत्याचारी लॉर्ड कर्झनवर लिहिलेले ‘कीचक वध’ हे नाटक त्याकाळी खूप गाजले. गोविंदराव टेंबे यांनी ‘संगीत पट-वर्धन’ या नाटकातून ब्रिटिशमालाला विरोध करून खादीचा पुरस्कार केला. अशा अनेक नाटकांनी त्या काळात स्वातंत्र्यचळवळीला बळ दिले. ब्रिटिशांनी दडपशाही करून अनेक नाटककारांना शिक्षा केल्या, अनेक नाटके बंद पाडली, पण तरीही नाटककार लिहीत होते आणि नेटाने नाटके सादर करत होती.
काव्य, कादंबर्या आणि नाटके या साहित्यप्रकारांव्यतिरिक्त इतरही अनेक साहित्यप्रकार होते, ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्यलढ्यामध्ये प्राण फुंकले होते. त्यामध्ये वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणारे लहान-मोठ्या कथा, लेख, क्रांतिकारकांची चरित्रे-आत्मचरित्रे अशा अनेक साहित्यकृतींचा समावेश होता. सगळ्याच साहित्यिकांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेऊन शस्त्रे हाती घेतली नाहीत, पण ‘लेखणी हे एक शस्त्र असते’ याची प्रचीती अनेक साहित्यिकांच्या साहित्यकृतींतून प्रत्ययास येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांना प्रेरित करणार्या साहित्याची तर निर्मिती झालीच, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही ते स्वातंत्र्य साजरे करणार्या, ज्यांनी ते मिळवून दिले त्यांना वंदन करणार्या साहित्याचीही निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. यात गीतांचा उल्लेख प्रामुख्याने करता येईल. ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘देश हा देव असे माझा’, ‘अजिंक्य भारत अजिंक्य जनता’, ‘उभवू उंच निशाण’ यांसारखी असंख्य गीते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लिहिली गेली आणि आजही ही गीते प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे स्फुल्लिंग चेतवतात. ही गीते म्हणजे केवळ कवीने किंवा गीतकाराने चालीत बसवलेले शब्द नव्हते, तर करोडो भारतीयांच्या मनातील त्या भावना होत्या. दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या गीतांचे सामूहिक गायन करतोच.
आज स्वातंत्र्य मिळून इतका काळ उलटून गेल्यानंतरही ही गीते ऐकल्यावर आपण शहारतो, भावुक होतो आणि अभिमानाने मान उंचावतो. आपल्या देशाने, स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला स्वातंत्र्यलढा किती महान होता, याची ही गीते आपल्याला स्मरण करुन देतात. 150 वर्षे ब्रिटिशांचा अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर मिळवलेले स्वातंत्र्य भारतीयांना प्राणाहून प्रिय होते आणि ते कायम राहील, हे या प्रत्येक गीताने, त्यातील प्रत्येक शब्दाने अधोरेखित केले आहे. साहित्यनिर्मिती ही केवळ मनोरंजनासाठी होत नाही, तर साहित्य प्रबोधन आणि मार्गदर्शनही करते, हे या स्वातंत्र्यावर आधारित साहित्यकृतींतून सिद्ध होते. स्वातंत्र्य चळवळ जशी आकार घेत होती, तसे स्वातंत्र्यावर आधारित लिहिल्या जाणार्या साहित्यप्रवाहातही बदल होत गेले आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिबिंब साहित्यातून वेळोवेळी उमटलेले दिसते. खरं तर या एकाच लेखात स्वातंत्र्यसंग्रामावरील साहित्याची महती वर्णन करणे, हे तसे अवघडच. पण, तरीही आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अशा साहित्यकृतींचा धावता आढावा घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न...
दीपाली कानसे