'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धेत तरुणाईचा उत्स्फुर्त सहभाग!

13 Aug 2024 14:46:55
red run marathon


मुंबई :      मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही एड्स बाबतची जनजागृती करण्यासाठईी रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी 'रन टू अॅण्ड एड्स' या संकल्पने अंतर्गत एचआयव्ही एड्स विषयाची महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करण्याकरिता दि. ११ ऑगस्ट रोजी ही मॅरेथॉन पार पडली. तरूणाईनेही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतानाच या स्पर्धेसाठी चांगल्या संख्येने हजेरी लावली.

या स्पर्धेत मुलांमध्ये टोपीवाला महाविद्यालयाच्या विशाल पावरा आणि विजय ओकसा यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. तर मुलींमध्ये रूबी धोडी (शासकीय दंत महाविद्यालय) आणि स्विटी म्हात्रे (विल्सन महाविद्यालय) यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. तर तृथीयपंथी समाजातून सहभागी झालेल्या गणेश चिखलकर (गव्हर्नमेंट लॉ कॉलेज) आणि सागर शहा (डी वाय पाटील) या विद्यार्थ्यांनी पहिले व दुसरे स्थान मिळवले.

दरम्यान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या आजाराबाबतची जनजागृती व्हावी याअनुषंगाने कार्यक्रम राबवण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण मुंबई महानगरात नागरिकांची चांगली उपस्थिती असणाऱ्या मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे, झोपडीबहुल भागात फ्लॅशमॉब आणि पथनाट्य राबवण्याच्या सूचना उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) आणि संचालक मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था संजय कुऱ्हाडे यांनी दिल्या आहेत.

तसेच एड्स बाबत जनजागृती करण्याकरीता पथनाट्य स्पर्धा, रिल मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबईतील १४० महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य करत आहे. तसेच महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या मदतीने मुंबईमधील २५० महानगरपालिका माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम राबवित आहे.


मॅरेथॉनसारख्या उपक्रमाचे उद्दिष्ट हे तरूणाईने आरोग्यदूत म्हणून एचआयव्ही एड्सविरोधात जनजागृती करणे हे आहे.
विजयकुमार करंजकर, अतिरिक्त संचालक (प्रभारी)



Powered By Sangraha 9.0