नवी दिल्ली : अदानी ग्रुपच्या अदानी पॉवर प्लांटबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अदानी पॉवर आता नव्या नियमांनुसार देशातही वीजपुरवठा करू शकणार आहे. केंद्र सरकारने वीज निर्यात नियमात सुधारणा केली असून देशांतर्गत बाजारपेठेत अदानी पॉवर आता उतरणार आहे. जुन्या नियमांनुसार, अदानी पॉवर त्याच्या कोळशावर चालणाऱ्या पॉवर प्लांटचे उत्पादन पूर्णपणे फक्त बांगलादेशला विकले जात होते.
दरम्यान, नव्या नियमांद्वारे अदानी पॉवर आता केवळ बांगलादेशच नाही तर कंपनी भारतालाही वीज विकू शकणार आहे. केंद्र सरकारने दि. १२ ऑगस्ट रोजी फेडरल पॉवर मिनिस्ट्री मेमोरँडम २०१८च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. जुन्या सुधारणेच्या अंतर्गत केवळ शेजारील देशाला वीजपुरवठा करणाऱ्या वीज उत्पादकांचे नियमन करण्यात येत होते. नव्या नियमांबाबत ऊर्जा सुरक्षेसह भारतीय हितांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे सध्या, अदानी पॉवरचा पूर्व झारखंडमधील १,६०० मेगावॅट (MW) गोड्डा प्लांट हा भारतातील एकमेव प्लांट आहे जो शेजारच्या देशात १००% वीज निर्यात करण्यासाठी कराराखाली आहे. आता सरकारच्या या निर्णयाचा फायदा कंपनीला होऊ शकतो. कारण बांगलादेशातील परिस्थिती अजूनही नाजूक असून अदानी पॉवरच्या करारानुसार जी काही वीज तयार होईल, ती फक्त बांगलादेशलाच दिली जाईल.