अभिनेते राजपाल यादवची कोट्यवधींची संपत्ती सील

13 Aug 2024 15:42:39

rajpal yadav  
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते राजपाल यादव मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केल्याचे सांगितले जात आहे. राजपाल यादव अता पता लापता हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि त्या चित्रपटाची निर्मिती पत्नी राधा यादव यांनी केली होती.
 
राजपाल यादवची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केली असून ही जप्ती २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लपता’ या चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटासाठी राजपालने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या वांद्रे शाखेतून पाच कोटींचे कर्ज घेतले होते. १२ वर्ष होऊनही राजपाल कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने बँकेने शाहजहांपूरमधील सेठ एन्क्लेव्हमध्ये असलेली त्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.
 
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुंबईतील अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपूरला गेले होते. त्यानंतर राजपालच्या प्रॉपर्टीवर बँकेचे बॅनर लावण्यात आले. ही मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची असून त्याची कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये, असे स्पष्टपणे त्या बॅनरवर लिहिले. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता जप्त केली.
 
राजपाल यादवने हे कर्ज त्याचे वडील नौरंगी लाल यादव यांच्या नावावर घेतले होते. तो हे कर्ज फेडू न शकल्यामुळे बँकेने ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणी राजपाल यादव यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Powered By Sangraha 9.0