बीड : बीडमधील उबाठा सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सोमवारी वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
बीड जिल्ह्यातील उबाठा सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण, बीड जिल्ह्याचे युवासेना जिल्हाप्रमुख गजानन कदम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवी बडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. गेल्या २ वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घेतला आहे. घरात बसून काम करता येत नाही त्यासाठी लोकांमध्ये मिसळावे लागते यावर माझा ठाम विश्वास आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसून टाकण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा भाग शेतीने समृद्ध करण्याचा आमचा निर्धार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना आणली, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली, मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं, बचत गटांच्या भांडवलात वाढ केली तसेच अनेक योजना लोकांसाठी सुरू केल्या आहेत. या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवून बीड जिल्ह्यात शिवसेनेला अधिक मजबूत करावे," असे आवाहन त्यांनी केले.