मुंबई : प्रेक्षकांचा कल चित्रपटांपेक्षा अधिक वेब सीरीजकडे जास्त दिसून येत आहे. ओटीटी माध्यमांवर एकाहून एक दर्जेदार कलाकृती येत असून या यादीत पंचायत ही वेब सीरीज विशेष गाजली. या वेब सीरीजचे तीनही भाग प्रेक्षकांना विशेष आवडले. ‘पंचायत ३’ या वेब सीरीजमध्ये कोणताही मोठा स्टार किंवा लोकप्रिय कलाकार नसूनही या वेबसीरिजने २०२४ मधील most watched Indian show च्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
Ormax मीडियने दिलेल्या माहितीनुसार, 'पंचायत ३' ही २०२४ वरील ओटीटीवर सर्वाधिक बघितली जाणारी वेबसीरिज ठरली आहे. २०२४ मधील पहिल्या सहा महिन्यांमध्ये 'पंचायत ३' ही वेब सीरीज प्रेक्षकांनी सर्वाधिक वेळा पाहिलेली वेबसीरिज ठरली आहे. प्राईम व्हिडीओवर 'पंचायत ३' ला २८.२ मिलियन व्ह्यूज मिळाले असून 'पंचायत ३' ने नेटफ्लिक्सवरील मल्टिस्टारर 'हिरामंडी'लाही मागे टाकले आहे.
हिरामंडी या वेब सीरीजची निर्मिती २५० कोटींमध्ये करण्यात आली होती तर 'पंचायत ३' चं बजेट ८० ते ९० कोटी असल्याचे सांगण्यात आले. कमी बजेट असून 'पंचायत ३' ने अव्वल क्रमांक पटकावला आहे.