मुंबई : राज ठाकरेंच्या ताफा अडवणारे कार्यकर्ते आमचे असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शुक्रवारी बीडमध्ये उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. तसेच त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्याही फेकण्यात आल्या होत्या. त्यामुळे उबाठा गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या सगळ्या प्रकारावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी असू शकतात. पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन आरक्षणासंदर्भात मराठा कार्यकर्त्यांचं होतं. राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यात मनसेचेही लोक असू शकतात. कारण मराठा आरक्षणासंबंधीचे आंदोलन हे पक्षविरहित आहे."
हे वाचलंत का? - मविआच्या काळात मला अटक करण्यासाठी सुपाऱ्या : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट
"आरक्षणासंदर्भात अनेक मोठमोठे मोर्चे निघाले. त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे, काँग्रेसचे, भाजपेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी सगळे एकत्र होते. आतासुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल. त्यामुळे आमचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. पण या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही. त्यात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.