...तर मोडी लिपीचे संपूर्ण पुनरुज्जीवन शक्य : पंकज भोसले

    10-Aug-2024
Total Views |
Pankaj Bhosle interview

दि. १७ जुलै रोजी ‘मोडी लिपी प्रथम मुद्रण दिन’ साजरा झाला. पण, एकेकाळी पत्रव्यवहाराची प्रमुख लिपी असणारी, मराठ्यांचा सुवर्ण इतिहास लिहिणारी मोडी लिपी आता फक्त या दिनापुरतीच मर्यादित राहिलेली दिसते. मोडी लिपी नामशेष का होत आहे, या प्रश्नाची चर्चा करताना तिचा समृद्ध इतिहास आणि सद्यस्थिती या विषयावर आधारित मोडी लिपी अभ्यासक आणि ‘हेमाद्री’ या मोडी लिपीतून प्रकाशित होणार्‍या मासिकाचे संपादक पंकज विद्याधर भोसले यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.

गेली अनेक वर्षे तुम्ही मोडी लिपीचा अभ्यास करत आहात. शिवाय मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राची जबाबदारीसुद्धा तुम्ही लीलया सांभाळत आहात. तर या लिपीचा अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि या अभ्यासाला तुम्ही कधी सुरुवात केली?

 
महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाच्या घरी काही ना काही जुने दस्ताऐवज पडलेले असतात, तसेच ते माझ्याही घरी होते. ते एका विशिष्ट लिपीमध्ये लिहिलेले आणि अनाकलनीय होते. जेव्हा शोध घेतला आणि अभ्यास सुरू केला, तेव्हा मला समजले की, ही मोडी लिपी आहे आणि प्रदीर्घ कालापासून ती अस्तित्वात आहे. मराठ्यांच्या काळातही ती होती. मग आपल्या घरामध्ये कोणीतरी असा कर्तबगार पुरुष होऊन गेला आहे, त्याचे नाव या दस्तऐवजात लिहिले गेले असेल. ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मोडी लिपीच्या अभ्यासाला मी सुरुवात केली. अगदी अक्षरओळख करून घेण्यापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि तीन ते चार वर्षे सातत्याने हा अभ्यास केला.

 
‘मोडी’ म्हटल्यावर ‘मोडलेलं’ किंवा ‘मोडून लिहिलेलं’ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, तर खरंच ही लिपी तशा प्रकारची आहे का?

 
त्या काळात पत्रे लिहिली जायची. ती मोठीमोठी, लांबलचक असायची आणि आताच्या काळात आहेत तशा त्या वेळी छपाईच्या मशीन्स नव्हत्या. त्यामुळे ती पत्रे जलद लिहिली जावी, म्हणून हात न उचलता सहज लिहिल्या जाणार्‍या मोडी लिपीचा वापर होऊ लागला. इंग्रजीमध्ये जशी ‘कर्स्यु’ लिपी असते जलद लिहिण्यासाठी, तशी मराठीमध्ये मोडी लिपी आहे.

आपल्या नेहमीच्या वापरातील देवनागरी लिपी आणि मोडी लिपी यांमधील साम्य आणि भेदांविषयी काय सांगाल?


देवनागरी लिपी संस्कृतोद्भव असल्यामुळे तिला व्याकरण आहे. पण, मोडी लिपीला तसे व्याकरण नाही. मोडी लिपीमध्ये दीर्घ, र्‍हस्व असा प्रकार नाही. ती सलग डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरीमध्ये लिहिताना हात उचलावा लागतो. मोडी लिपी हात न उचलता सलग लिहिली जाते.

मोडी लिपी ही कधी अस्तित्वात आली, याविषयी अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याविषयी वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. तेव्हा ही लिपी नेमकी कधी अस्तित्वात आली?


जे दस्तऐवज उपलब्ध असतात, त्यावरूनच कोणतीही लिपी कधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा निष्कर्ष लावता येतो. काही इतिहासकारांच्या मते, मोडी लिपी फार आधीपासून अस्तित्वात आहे. पण, तसे पुरावे मिळत नाहीत. मौर्यकाळात अस्तित्वात आली म्हणून ती मोडी लिपी आहे, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. आम्ही या सगळ्या पत्रवाचनांमधून असा निष्कर्ष काढतो की, बाराव्या शतकामध्ये यादवांचे साम्राज्य होते. त्या काळात ‘हेमाडपंथ’ नावाचे पंथसचिव होते. त्यांनी या मोडी लिपीला शासकीय व्यवहारात आणले आणि त्याचे जनक झाले. आधीपासून अस्तित्वात असलेल्या देवनागरी लिपीमध्ये बदल करून, वेगळी अक्षरे तयार करून शीघ्र लिखाणासाठी त्यांनी ती लिपी राज्यव्यवहारामध्ये आणली आणि तेव्हापासून म्हणजे १२व्या शतकापासून ती अस्तित्वात आहे.
 
 
मोडी लिपीत ‘र’ या अक्षराची एक गंमत आहे, असे म्हटले जाते. तर नेमकी काय आहे ही गंमत?


मोडी लिपीमध्ये ‘र’ आणि ‘ड’ या दोन अक्षरांची करामत अशी आहे की, देवनागरीमध्ये ही दोन अक्षरे लिहिताना पेन उचलावे लागते, पण मोडीमध्ये ही अक्षरे लिहिताना पेन उचलावे लागू नये म्हणून ‘र’ आधीच्या अक्षराच्या खालीच खेचून आणि ‘ड’ आधीच्या अक्षराच्या वर अर्धा चंद्र ( ॅ) काढून लिहिले जाते. म्हणजे ‘रफ्तार’ असा शब्द असेल तर ‘रफ्ता’ नंतर ‘र’ न लिहिता ‘ता’ च्या खालीच लिहिला जातो.
 
दि. १७ जुलै हा दिवस ‘मोडी लिपीतील प्रथम मुद्रण दिन’ म्हणून साजरा केला जातो, तर या दिवशी मोडी लिपीमध्ये नेमकं काय आणि कशाप्रकारे मुद्रित केलं गेलं?

 
जेव्हा इंग्रज आपल्याकडे आले, तेव्हा आपल्याकडचे व्यवहार त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना इथली लिपी समजून घेणे आवश्यक होते. तेव्हा त्यांनी आपापल्या लिपींचा अभ्यास सुरू केला. सर चार्ल विल्किन्स यांनी लोखंडाचे खिळे तयार केले आणि १८०२ मध्ये त्यांनी एक जाहिरात आणि संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला, ज्याच्यामध्ये या मुळांक्षरांची माहिती दिलेली होती की ती कशी लिहायची, त्यांचे अर्थ काय, त्यांची वळणे कशी आहेत या सगळ्याची माहिती त्यात होती.
 
एकेकाळी पत्रव्यवहाराची प्रमुख लिपी असणारी, इतका समृद्ध इतिहास असणारी मोडी लिपी काळाच्या ओघात दुर्लक्षित होण्याची कारणे काय आहेत?


वेगवेगळ्या काळामध्ये इतिहासामध्ये वेगवेगळे बदल झाले. कोणत्याही काळामधल्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, मग तो शिवकाळातला असेल किंवा पेशवेकाळातला तर मोडी लिपी हे एकमेव साधन आहे. कारण, सगळे दस्ताऐवज मोडीमध्येच लिहिले गेलेले आहेत. बाराव्या शतकापासून प्रदीर्घकाळ व्यवहारात असलेली मोडी लिपी १९५७ साली ती क्लिष्ट आहे, तिचा उपयोग नाही म्हणून व्यवहारातून बाद करण्यात आली. हळूहळू ती शालेय अभ्यासक्रमातूनसुद्धा बाद झाली. मोडीचा वाचकवर्ग, अभ्यासवर्ग कमी झाला. तिच्याकडे लक्ष पुरवले गेले नाही म्हणून ती नामशेष होत चालली आहे.

मोडी लिपी ही सलग लिहिली जाते, मग सध्याच्या कीबोर्डच्या काळात ती मुद्रित करण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे का?


तंत्रज्ञाच्या मदतीने कुठलीही अवघड गोष्ट सोपी करता येते. चिनी लिपीसुद्धा मोडीसारखी आहे, पण तिचे कीबोर्ड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे मोडी लिपीचेही फॉन्ट्स, कीबोर्ड्स तयार केले जाऊ शकतात. पण, या लिपीकडे तितके लक्षच पुरवले गेले नाही.

भाषा ही मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होत राहते, पण लिपीचं तसं होताना दिसत नाही. मग ती मोडी लिपी असेल किंवा इतर कुठलीही लिपी. त्या इतिहासजमा होतात किंवा इतिहास अभ्यासकांपुरत्या मर्यादित राहतात, तर या लिपी जगवायच्या असतील, तर काय प्रयत्न केले पाहिजेत?


१९६० पर्यंत मोडी लिपी शाळेमध्ये शिकवली जात होती. शाळेच्या पाठ्यपुस्तकात मोडी लिपीसंदर्भात एक तरी धडा असायचा. मोडी लिपी जर पुन्हा अस्तित्वात आणायची असेल, तर ती शाळेत पुन्हा शिकवली जाणे गरजेचे आहे. मोडी लिपी शाळेत शिकवली गेली, तिचा अभ्यास पुन्हा सुरू झाला तर ती नक्कीच पुनरुज्जीवित होईल.

मोडी लिपी जर देवनागरी किंवा रोमन लिपीसारखी दैनंदिन जीवनात वापरली गेली किंवा ती अधिकाधिक लोकांना लिहिता येऊ लागली, तर त्याने काय बदल होतील?

आपली मराठी भाषा ही एकमेव भाषा आहे जिला देवनागरी आणि मोडी अशा दोन लिपी आहेत. मोडी लिपी जर पुन्हा अस्तित्वात आली, तर आपली समृद्ध मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. आपल्या घरी जर मोडी लिपीतील कागदपत्रे असतील, तर ती आपल्याला इतर कोणाकडून तरी समजून घ्यावी लागतात किंवा लिप्यांतरकारांकडून लिप्यांतरित करून घ्यावी लागतात, मग आपण स्वत: जर ही लिपी शिकलो, तर आपली कागदपत्रे आपण समजून घेऊ शकतो आणि आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला समजू शकतो. त्याचबरोबर मोडी लिपीचा एक मुख्य फायदा म्हणजे, ती लिहिता येऊ लागल्यामुळे हस्ताक्षर सुधारते. मोडी लिपी जर अधिकाधिक लोकांना समजू लागली, तर आपला खूप मोठा इतिहास जो अजून अंधारात आहे तो प्रकाशात येईल.

‘हेमाद्री’ या मोडी लिपीतील नियतकालिकाचे तुम्ही संपादक आहात. नियतकालिक तर खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत, वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली आहेत, पण एका वेगळ्या लिपीमध्ये नियतकालिक सुरू करणं ही खरंच एक अभिनव कल्पना आहे. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?


जेव्हा आम्ही मोडी लिपीचा वर्ग सुरू केला, तेव्हा आमच्या लक्षात आले की, मोडी लिपी शिकण्यासाठी खूप कमी पुस्तके उपलब्ध आहेत आणि मोडी ही अशी लिपी नाही, जी लगेच शिकता येते. ती शिकण्यासाठी खूप सराव करावा लागतो. हा सराव लिखित स्वरूपातला असतो. तो सराव करता असताना लिखाणाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आम्ही मोडी लिपी शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी मिळून ‘हेमाद्री’चा अंक सुरू केला. ‘हेमाद्री’ अंक हस्तलिखित असतो. आजवर ‘हेमाद्री’चे १४ अंक प्रकाशित झालेले आहेत. इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंवर ‘हेमाद्री’ मध्ये संदर्भासहित लेखन केले जाते.

- दीपाली कानसे