संवाद यात्रेने ढवळणार राज्य

01 Aug 2024 19:00:25

Bawankule
 
मुंबई : ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान भाजपा संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. संवाद यात्रेदरम्यान राज्यातील मंडल स्तरावरील ७५० ठिकाणी भाजपाचे अधिवेशन होईल व राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
 
बावनकुळे म्हणाले, भाजपाच्या ६९ संघटनात्मक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ३६ नेते मुक्कामी जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण व अमरावती येथे तर मी स्वत: वर्धा व भंडारा येथे अधिवेशनात सहभागी होणार आहे. या माध्यामातून राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची माहिती आम्ही समाजातील अखेरच्या मानसापर्यंत पोहचविण्यासाठी संवाद यात्रा करणार आहोत.
 
देवेंद्रजी उत्कृष्ठ संघटक
महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठ संघटक आहेत. शासन-प्रशासनात काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांचा संघटनेला मोठा फायदा आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व घेईल. तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेलच. मात्र, राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी फडणवीसांचे शासनातील व संघटनेतील स्थान महत्वाचे आहे. आम्हाला तर ते महाराष्ट्रात राहावे असेच वाटते.
 
डीपीसीच्या पैशातून कॉंग्रेसने मेळावे घेतले
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीसीमधून विकासकामांसाठी निधी दिला. कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या निधीचा वापर राजकीय कारणासाठी व पक्षाचे मेळावे घेण्यासाठी केला. आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाचे मेळावे पक्षासाठी घेण्यात आले. जनतेचा पैसा खर्च केला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
 
नागपूरच्या विकासासाठी १२०० कोटीचा निधी
महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विकासासाठी मोठा निधी दिला आहे. ७५ विभागातून जिल्हाचा विकास होणार आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री फडणवीस हे जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी १३ ठिकाणी तालुका कामगार केंद्राचे उद्घाटन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
ते असेही म्हणाले
• मविआचे सरकार आले तर लाडकी बहिण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह महायुती सरकारच्या व मोदी सरकारच्या योजना बंद करणार.
• उद्धव ठाकरे यांनी आणलेलं सगळे प्रस्ताव फडणवीस यांनी मुख्यमंत्री काळात मंजूर केले होते.
• उद्धव ठाकरे या चिंतेत आहेत की मुंबई आणि कोंकणातून त्यांचे व्होट गेले. भाजपसोबत असताना शिवसेनेचे 18 खासदार निवडुन येत होते. ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार केला.
• महायुती मध्ये कोणती जागा कोण लढणार हा निर्णय युतीमधील तिन्ही पक्षाचे नेते व भाजपाचे केंद्रीय नेतृत्व घेणार.
 
 
Powered By Sangraha 9.0