कणखर मातृत्व, 'विथ आर्य'

    09-Jul-2024
Total Views |
with arya ngo mumbai


शीतल आणि विक्रम भाटकर यांचा सात वर्षांचा मुलगा आर्य भाटकर. आर्यला एका दुर्मीळ अनुवंशिक आजाराने ग्रासले होते, ज्यामुळे चयापचयाचा विकार होतो. या आजारामुळे आर्यला त्रास व्हायचा. आर्यच्या स्मरणार्थ शीतल आणि विक्रम यांनी ‘विथ आर्य’ ही संस्था स्थापन केली. ‘विथ आर्य’ या संस्थेचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख...

दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता।
अभ्यासेन न लभ्यन्ते, चत्वारः सहजाः गुणाः॥
दान देण्याचा स्वभाव, गोड बोलणे, धैर्य आणि काळवेळ जाणणे या चार गोष्टी अभ्यासाने मिळत नाहीत. हे गुण स्वाभाविकपणे माणसात आलेले असतात. दान ही कृतीच उदात्त आहे. इतकी उदात्त आहे की, आपल्या छोट्याशा दानाच्या कृतीने आपण अनेक लोकांच्या मनाला स्पर्श करून त्यांना लढण्याचे, जगण्याचे बळ देऊ शकतो. आपल्यावर संकट आले असताना आपला गोड स्वभाव न सोडणे, गरज असणार्‍या लोकांना आपला मदतीचा हात पुढे करणे, धैर्य बाळगून, संयमी वृत्तीने काळवेळ जाणून इतरांसाठी उभे राहणे, हे सगळे गुण एकवटलेले व्यक्तिमत्व म्हणजे शीतल भाटकर. दान या आपल्या छोट्याशा कृतीने आपल्या बाळाला सतत आठवणीच्या रुपात कायम आपल्याजवळ बघू शकतो. असा जगावेगळा विचार मुंबईत राहणार्‍या शीतल भाटकर आणि विक्रम भाटकर यांनी केला. हा विचार दानाच्या कृतीइतकाच उदात्त आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेला हा प्रवास अनेकांच्या आयुष्यात आज आशेचा किरण बनला आहे. या त्यांच्या कार्यामागचा उद्देश म्हणजे समाजजीवनातील सकारात्मकता वाढवणे, लोकांच्या जीवनात शाश्वत बदल घडवून आणणे, सामाजिक समानता, न्याय मुलभूत हक्कांसाठी लढणे हा आहे.

‘विथ आर्य’मार्फत अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘दोन घास’ हा उपक्रम. या उपक्रमात मुंबई, कळवा, रत्नागिरी, कोल्हापूर येथील रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहूंना पूर्णपणे मोफत जेवण पुरवले जाते. या जेवणात पोळी, भाजी, दालखिचडी आणि एक केळे असा समावेश असतो. या उपक्रमाची सुरुवात 2016 साली मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या बाहेर, दिवसाला 50 लोकांना जेवणवाटप अशी झाली. आज दिवसाला हजार लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत. यानंतर, 2020 साली रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल, कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला. 2022 साली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, कोल्हापूर येथे याप्रकारचा उपक्रम सुरू झाला.

आश्रय

या योजनेअंतर्गत संस्था रुग्णांसह कुटुंबांना दत्तक घेते. मुंबईत केईएम किंवा टाटा रुग्णालयाच्या बाहेर आपण देशभरातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक पाहातो. ऊन, वारा, पावसात हे नातेवाईक फुटपाथवर बसलेले असतात. ते फुटपाथवर राहातात. कारण, कोठे भाड्याने राहाण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नसतात. तसेच उपचार आणि गावाहून रुग्णालयात उपचाराला येण्याजाण्यामध्येच त्यांचा भरपूर खर्च झालेला असतो. रुग्णाच्या उपचारासाठी पैसे राखण्यासाठी किंवा रुग्णाच्या काळजीने हे फुटपाथवर थांबलेले नातेवाईक किंवा रुग्ण दोनवेळेचे सकस अन्नही खाण्याचेही टाळतात. या उपक्रमात संस्थेतर्फे दत्तक घेतलेल्या कुटुंबाला कणिक, पोहे, साखर, चहा, कडधान्ये, तेल इत्यादी शिधा मोफत पुरवला जातो. हितचिंतक आणि देणगीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रोत्साहनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या राबवता येतो.

दवादान

गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन करणे. देशामध्ये सरकारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातूनही रुग्णांच्या उपचारासाठी अनेक योजना आहेत. स्वस्त औषधांसाठी जेनरीक मेडिकलही आहेत. मात्र, अनेकदा ग्रामीण भागातून शहरी भागात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना औषध कोठून विकत घ्यावीत, रुग्णाच्या उपचारांसंदर्भातील आरोग्यचाचण्या कोठे कराव्या याबद्दल माहिती नसते. अनेकवेळा त्यांची फसवणूक होते किंवा वेळेवर त्यांना औषधे उपबल्ध होत नाहीत किंवा आरोग्यचाचण्या करायलाही त्रास होतो. संस्था यासाठी रुग्णांना किंवा त्यांची सुश्रुषा करणार्‍या नातलगांना मदत करते. औषध वितरकांच्या सहकार्याने सवलतीच्या दरात औषधे खरेदी करता यावी, यासाठी मदत केली जाते. रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहूंना चाचण्यांपासून ते औषधोपचारापर्यंत प्रत्येक फाईलची बारकाईने तपासणी करून मदत आणि मार्गदर्शन केले जाते. यामुळे रूग्णांना बर्‍यापैकी मदत उपलब्ध होते.

शौर्य

दुर्मीळ अनुवंशिक ‘लायसोमल डीसऑर्डर’ या आजाराबद्द्ल समाजात जागरूकता नाही. या आजाराबद्दल समाजात जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. कारण दुर्देवाने या आजाराने कोणी ग्रस्त असेल, तर संबंधितांना कळतच नाही की आपल्या रुग्णाला कोणता आजार झाला आहे. जर या आजारासंदर्भात त्यांना व्यवस्थित माहिती दिली, तर त्यासंदर्भात संबंधित योग्य ती काळजी घेऊ शकतात. लायसोमल स्टोरेज हा आजार अनुवंशिक चयापचय रोग असून एंजाइमच्या कमतरतेमुळे होतो. याबद्दलची माहिती समाजात देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘शौर्य’ या योजनेअंतर्गत संस्था ही जागृती करत असते. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संस्था करते. या उपक्रमामुळे समाजात जागृती झाली आहे.

चाय की चुस्की

रुग्णांचे नातेवाईक, त्याची काळजी घेणारे यांच्याशी संवाद साधताना लक्षात आले की, चहाची वेळ ही खर्‍या अर्थाने क्षणभर विश्रांतीची वेळ असते. दोन घटका थांबण्याची, पुन्हा ताजेतवाने होण्याची वेळ असते. आणि येथूनच ‘चाय की चुस्की’ या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची काळजी घेणार्‍यांना, चहा आणि बिस्किटे पुरवली जातात.

ज्ञान

गंभीर आजाराने कुटुंंबातली कर्ती व्यक्ती गेली, तर त्याच्यावर आधारलेल्या कुटुंंबाची परिस्थिती दयनीय होती. अनेकवेळा त्या घरातल्या मुलांना शिक्षण सोडून दोनवेळच्या भाकरीसाठी कामधंदे करावे लागतात. त्या मुलांचे शिक्षण थांबते. नुसते शिक्षण थांबते असे नाही, तर त्या मुलांचे आणि पर्यायाने त्या कुटुंबाचे शिक्षण थांबते. संस्था अशा कुटुंंबातील पात्र मुलांना शिष्यवृत्ती देते. त्यांना ज्ञानार्जनासाठी मदत करते.

संस्थेचे सेवाकार्य निरंतर वाढत आहे. संस्थेचा पारदर्शी निस्वार्थी सेवाभावी कारभारामुळे अनेक संस्था, दानशूर व्यक्ती संस्थेसोबत आहेत. ‘म्हाडा’ने दिलेल्या जागेत टाटा कॅन्सर रुग्णालयाद्वारे चालवल्या जाणार्‍या 100 खोल्यांसाठी ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ यांच्या सहकार्याने त्यांची स्वयंपाकघर सुविधा सुरू केली आहे. यात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण रुग्ण आणि त्याच्यासोबत राहाणार्‍या नातेवाईकांना दिले जाते. यासाठी देणगीदार आणि हितचिंतक यांचा पाठिंबा त्यांना सतत लाभला आहे.
2016 साली शीतल भाटकर यांनी पतीच्या पाठिंब्याने दानाच्या साध्या कृतीतून अनेकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडे स्वयंप्रेरणेतून आलेले 70 स्वयंसेवक आहेत. सर्व स्तरांतून आलेल्या या स्वयंसेवकांचा मदत करणे, आणि सेवा करणे हाच हेतू आहे. त्यांना समाजाकडून असाच पाठिंबा मिळत राहो आणि त्यांनी हाती घेतलेले सगळे उपक्रम यशस्वी होवो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क ः 9819226067)
कल्याणी काळे