सेवार्थ रुग्णालय

    09-Jul-2024
Total Views |
sevarth hospital pune city


‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’ आणि ‘बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक यांनी संयुक्तपणे ‘सेवार्थ रुग्णालय’ पुणे येथे सुरू केले. या रूग्णालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. या उद्धाटन सोहळ्यानिमित्त पुण्याच्या अंतुले नगर येथील कुष्ठरूग्ण वस्तीचा पूर्वेतिहास या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

'बाळासाहेब देवरस पॉली क्लिनिक’ आणि ‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’च्या माध्यमातून येवलेवाडी येथील अंतुले नगर या कुष्ठरुग्ण वस्तीमध्ये ‘सेवार्थ रुग्णालय’ सुरू केले आहे. दि.15 जून रोजी सुरुवात झाली. 1 हजार, 400 ते 1 हजार, 500 लोकसंख्या असणारी ही वस्ती आहे. समाजाने कधीकाळी वाळीत टाकलेल्या कुष्ठरुग्णांनी स्वत:ला लपण्याची जागा म्हणून येवलेवाडीची डोंगरकूस निवडली. या ठिकाणापासून जवळच सरकारने ब्यानडोरवाला कुष्ठरुग्ण रुग्णालय उपलब्ध करून दिले होते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतील कुष्ठरुग्णांचे उपचार या ठिकाणी होत असत. परंतु, कुष्ठरुग्ण पूर्ण बरा होऊनसुद्धा कुटुंबीय किंवा गावकरी स्वीकारत नव्हते. यामुळे बरे झालेले रुग्ण आसर्‍यासाठी पुन्हा याच ठिकाणी राहायला येत. यामुळे हळूहळू ही वस्ती वसत गेली.

कुष्ठरुग्णांचे संसार कसे थाटले हा एक वेगळाच विषय आहे. कुष्ठरुग्ण असलेली मुले, पुरुष या ठिकाणी आले. तसेच स्त्रिया आणि मुली यासुद्धा घराबाहेर काढल्या गेल्या होत्या. यांना एकमेकांचा आधार हवा होता. यातूनच एकमेकांच्या परिचयाने यांचे विवाह झाले आणि त्यांनी आपले संसार थाटले. विवाह जुळताना लग्नपत्रिका, जात-पात, मंगल कार्यालय, जेवणावळ असे काही थाट-माट, सोहळे झाले नाहीत. एकमेकांना दिलेल्या शाब्दिक वचनांनी आणि चार-पाचजणांच्या साक्षीने यांचे विवाह झाले.

आजही या परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. असे असले, तरी वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकल्याचे पाहायला मिळते. पुढच्या पिढीतील युवक-युवतींचे लग्न जुळण्यासाठी अडचणी येत आहेत. समाजामध्ये असलेला कुष्ठरुग्ण म्हणून डाग अप्रत्यक्षरित्या काम करतच आहे. अजूनही यांच्या नात्यागोत्यातून, अन्य समाजांतून लग्नासाठी मुले किंवा मुली यांना दिल्या जात नाहीत. परिणामी वस्तीतीलच मुलामुलींच्या एकमेकांच्या पसंतीने जोडीदार निवडला जातो.

1970-72च्या दरम्यान वसलेली ही वस्ती आज अंतुले नगरमध्ये तिसरी पिढी नांदत आहे. पहिल्या पिढीला समाजाचा प्रचंड त्रास सोसावा लागला. समाजाने त्यांना वाळीत टाकले होते. दुसरी पिढी जरी कुष्ठरुग्ण नसली, तरी गरिबीमुळे त्यांना आपले जीवन व्यतित करावे लागले होते. अपूर्ण शिक्षण आणि कौशल्य नसल्यामुळे त्यांना नोकरी हवी तशी मिळाली नव्हती. परिणामी मिळेल त्या रोजगारावर त्यांना उदरनिर्वाह करावा लागला.

तिसर्‍या पिढीला मात्र शिक्षणाची संधी आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हव्या त्या शिक्षणाची संधी मिळत नाही. तिसर्‍या पिढीची धडपड ही उत्तम नोकरी मिळवण्यासाठी दिसत आहे. काही कौशल्य घेण्याच्या दिशेने प्रयत्न आहेत. त्यातल्या त्यात महिला आणि मुलींचा पुढाकार मोठा आहे. चार पैसे शिल्लक असतील, तर मुलांचे विवाह, शिक्षण पूर्ण करता येईल. अशी धडपड येथील पालकांची दिसत आहे.

बिकट आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असतानाही कधी स्वाभिमानाने जगणे सोडले नाही. कधी चोर्‍या, दरोडे टाकले नाहीत किंवा भीकही मागितली नाही! स्वाभिमानाने जगण्याकडेच यांचा कल होता आणि आहे. आज समाजाकडूनही यांचा स्वीकार होत आहे. कपडे, अन्नधान्याचे वाटप, रेशनिंगचे मिळणारे धान्य यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. येथील युवक-युवती आणि महिलांना रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’च्यावतीने या ठिकाणी काम सुरू केले आहे.

या ठिकाणी रोजगाराव्यतिरिक्त अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. जसे की, तरुणांमधील व्यसनाधीनता, अर्धवट शिक्षण सोडलेले तरुण-तरुणी, लहान मुलांना पौष्टिक आहार, वृद्धांच्या सुश्रुषेचा प्रश्न. कौशल्यधारित शिक्षण, रोजगारविषयक मार्गदर्शन, संस्कारवर्ग, अभ्यासिका, ग्रंथालय, व्यायामशाळा यांचीही कमतरता जाणवते.

‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’ आणि ‘बाळासाहेब देवरस पॉली क्लिनिक’ यांनी संयुक्तपणे ‘सेवार्थ रुग्णालय’ या ठिकाणी सुरू केले आहे. कुष्ठरुग्णवस्ती असल्यामुळे एकही क्लिनिक या ठिकाणी कोणीही सुरू केलेले नाही. परिसरातील दवाखाने नागरिकांना आर्थिकदृष्टीने परवडणारे नाहीत. स्थानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपात सुरू केली आहे. सुरुवातीला आठवड्यातील तीन दिवस रोज दोन तास अशी वेळ ठेवण्यात आलेली आहे. या सेवार्थ रुग्णालयामध्ये शक्य तेवढी मोफत औषधे दिली जातात.

‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’ आणि ‘बाळासाहेब देवरस पॉली क्लिनिक’ ‘सेवार्थ रुग्णालया’चे उद्घाटन दि. 15 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कुंदन चौधरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कात्रज भागाचे कार्यवाह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक’चे डॉक्टर नितीन झोडगे, ‘श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र घोमण प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अविनाश घोमण, उपाध्यक्ष विवेक घोमण आणि सचिव अभिजीत घोमण तसेच राहुल पांगरीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोंढवा नगराचे कार्यवाह, सतीश सावंत, राहुल पाटील, नवनाथ कामठे, दत्ता पोकळे, शीतल भोसले, पूनम तेलगोटे, सुवर्णा घोमण आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिजित घोमण
9730074507