कोस्टल रोड प्रकल्पाची पालिका आयुक्तांकडे पाहणी!

    09-Jul-2024
Total Views |
bmc commissioner visited costal road porject

मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या प्रकल्पावर महानगरपालिकेची यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या प्रकल्पातील उत्तर वाहिनीमार्गावर हाजी अली पासून ते खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतू दरम्यानची सुमारे साडेतीन किलोमीटर उत्तर अंतराच्या मार्गिकेची मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दि. ९ जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.   
 
दरम्यान धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी , अतिरिक्त आयुक्त ( पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची अंतिम कामे सुरू आहेत. हा प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो स्ट्रींग आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केल्यानंतर दोन्ही मार्गिकांच्या कामांना वेग देण्यात आला आहे.
 
तरी या पाहणी दरम्यान प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी, सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते.