रशिया दौऱ्यात मोदींनी घेतली भारतीय समुदायाची भेट; म्हणाले,"आता भारताला जग..."

    09-Jul-2024
Total Views |
 MODI
 
मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, दि. ८ जुलै २०२४ दोन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर पोहोचले. मॉस्कोच्या वनुकोवो-२ विमानतळावर पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. येथे त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-रशिया संबंधांवर प्रकाश टाकला. यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या कामांबद्दल उपस्थित लोकांना माहिती दिली.
 
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, "मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे. मी माझ्यासोबत १४० कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. तिसऱ्यांदा सरकारमध्ये आल्यानंतर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. भारतीय समुदायासोबतची पहिली भेट इथे मॉस्कोमध्ये होत आहे त्याच दिवशी मी शपथ घेतली की मी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट ताकदीने काम करेन."
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकारच्या अनेक उद्दिष्टांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आकडा येणे हा देखील योगायोग आहे. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ही उद्दिष्टे मोठी वाटू शकतात. पण आम्ही जी काही उद्दिष्टे ठेवतो, आजचा भारत ती साध्य करतो."
 
मोदींनी आपल्या भाषणात भारताच्या चांद्रयान मोहिमेचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, "आज भारत हा असा देश आहे ज्याने चंद्रावर चांद्रयान पाठवले आहे जिथे जगातील इतर कोणताही देश पोहोचला नाही. आज भारत हा असा देश आहे जो जगाला डिजिटल व्यवहारांचे सर्वोत्तम मॉडेल देत आहे. आज भारत हा असा देश आहे जो उत्कृष्ट सामाजिक क्षेत्रातील धोरणांद्वारे आपल्या नागरिकांना सक्षम बनवत आहे. आज भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम असलेला देश आहे."