मुरूड तालुक्यात भातलावणीला सुरुवात

750 मिमी पाऊस पावसावरच शेतीची मदार

    09-Jul-2024
Total Views |

Rice Crops
 
मुरूड : पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुरूड तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेतीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील शिघ्रे, नागशेत, सायगाव, उंडरगाव, खारआंबोली, वावे, उसरोली, मजगाव, वालवटी, आदाड पंचक्रोशीत भातलावणी सुरू झाली आहे. रविवार, दि. 7 जुलैपर्यंत 750 मिमी पाऊस पडला आहे.
 
यामुळे मजुरीने माणसे घेऊन शेतीची कामे जोरकसपणे सुरू आहेत. पावसामुळे शेतजमिनीत पाणी असल्याने लावणीला वेग वाढला आहे. पाणथळ जमिनीवर अधिक वेगाने लावणीची कामे जोमाने सुरू आहेत. तालुक्यात तीन हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. भातपीक हे तालुक्यातील मुख्य पीक आहे.
 
आंबोली धरणाच्या कालव्यांची शेतकर्‍यांना प्रतीक्षा
तालुक्यात धरणे आहेत. मात्र, शेतीसाठी धरणातून कालवे काढले नसल्याने संपूर्ण भातशेती पावसावरच अवलंबून आहे. 2009 साली लघुपाटबंधारे खात्यांतर्गत मुरूडपासून पाच कि.मी. अंतरावर आंबोली हे आजूबाजूच्या 12 गावांसाठी मोठे सिंचन धरण बांधलेले आहे. अद्याप उजवा तीर कालवा, डावा तीर कालवा अशी दोन कालव्यांची कामे अर्धवट आहेत. 2015 सालापासून हे बांधकाम बंद आहे.
- धर्माजी हिरवे, नागशेत-पारगान येथील शेतकरी
 
तर, 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल...
कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा झाल्यास 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांना मोठे कृषी उत्पन्न मिळू शकते. सध्या आंबोली धरणातील पाण्याचा उपयोग मुरूड शहर आणि काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे.
- रघुनाथ माळी, शिघ्रे येथील शेतकरी