मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी पाऊल! बावनकुळेंची प्रतिक्रिया
09-Jul-2024
Total Views |
मुंबई : राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नवीन शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत मेडिकल, अभियांत्रिकी यासह व्यावसायिक अभ्यासक्रमातून शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना मिळणारा शिक्षण शुल्क व परीक्षा परीक्षा शुल्काचा ५०% चा लाभ आता १००% देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या OBC, EWS आणि SEBC कुटुंबातील मुलींना याचा फायदा होईल," असे त्यांनी सांगितले.
माध्यमिक ते व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत देणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यातील 'सावित्रीच्या लेकी'साठी महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे त्यांनी आभार मानले.