"जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळा म्हणत..."; तेजस ठाकरेंच्या नृत्यावर शेलारांचा घणाघात

    09-Jul-2024
Total Views |
 
Shelar & Tejas Thackeray
 
मुंबई : जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळा म्हणत दहिहंडीत नाचताना दिसला नाही तो अंबानींच्या लग्नात नाचताना दिसला, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंवर केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत तेजस ठाकरेंवर निशाणा साधला.
 
 
 
सध्या सर्वत्र मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच अनंत अंबांनींचा संगीत सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे हे या संगीत समारंभात नृत्य करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  बेस्टवर २५ वर्ष एकाच परिवाराचं वर्चस्व! भंगार घोटाळ्याची चौकशी करा
 
यावर आशिष शेलार म्हणाले की, "जो मराठी तरुण 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही, ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत, जो होळीला 'आयना का बायना..' म्हणताना कधी दिसला नाही आणि 'गणा धाव रे... मला पाव रे..' म्हणत जाखडी नृत्यात कधी ज्याने कोकणी ठेका धरला नाही तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला. हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात 'धकधक' झाले," असे ते म्हणाले.
 
तसेच तेजस ठाकरेंच्या नृत्यावरून आशिष शेलारांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "हे नृत्य पण कसे जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे 'संजयकाका' महाराष्ट्राला पटवून देतीलच," असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.